हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोकणातील बारसू रिफायनरीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले असून या प्रकल्पाला विरोध दर्शवण्यात आला आहे. स्थानिकांनी या प्रकल्पाच्या विरोधात ठिय्या मांडला असून या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज बारसूमध्ये जाऊन तेथील ग्रामस्थांशी संवाद साधणार आहे. तत्पूर्वी ठाकरेंना आव्हान देणाऱ्या नारायण राणेंना सामनातून ललकारण्यात आल आहे. उद्धव ठाकरे बारसूत जात आहेत म्हणून कोकणातील काही आडूपांडूंनी आव्हानाच्या पिचक्या बेडक्या फुगवल्यात, पण आम्ही कोकणात जाणारच असं सामना अग्रलेखातून म्हंटल आहे.
लढाऊ कोकणी माणसाला भेटून त्याची वेदना समजून घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज बारसूला निघाले आहेत. लोकशाहीत पोलीस लोकांची डोकी फोडत असताना उद्धव ठाकरे यांनी तेथे पोहोचू नये, त्यांच्या मार्गात अडथळे आणावेत यासाठी उपऱ्यांचे राजकीय टाल प्रयत्नशील आहेत. उद्धव ठाकरे बारसूत जात आहेत म्हणून कोकणातील काही आडूपांडूंनी आव्हानाच्या पिचक्या बेडक्या फुगवल्यात. ‘कोकणात पाय ठेवून दाखवा, इंगा दाखवतो’ वगैरे नेहमीच्या वल्गना केल्या. एवढेच नाही तर या विषारी रिफायनरीच्या समर्थनार्थ हे ‘इंगा’वाले मोठा मोर्चा काढून म्हणे ताकद वगैरे दाखवणार आहेत. खोके हाताशी असले की भाडोत्री ताकद दाखवली जाते असं म्हणत सामनातून राणेंवर नाव न घेता निशाणा साधला आहे.
भावी पिढीच्या भविष्यासाठी आणि कोकणच्या विकासाला गती देण्यासाठी बारसू प्रकल्प होणे कसे गरजेचे आहे ते सांगण्यासाठी म्हणे हा मोर्चा आहे. कोकणचे व भावी पिढीचे भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी रिफायनरी हवीच, असे हे लोक म्हणत आहेत. हे असे असेल तर मग शेकडो लोक रिफायनरीच्या विरोधात आणि आपल्या जमिनी, मच्छीमारी वाचवण्यासाठी रस्त्यावर का उतरले आहेत? सत्य असे आहे की, जे लोक रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करीत आहेत, त्या सगळय़ांचे, राजकीय पक्षांचे आणि नेत्यांचे आर्थिक, व्यावसायिक हितसंबंध तेथे गुंतलेले आहेत.
रिफायनरीस स्थानिक लोकांचाच विरोध आहे व तो विरोध त्यांनी लोकशाही मार्गाने चव्हाट्यावर आणला. बारसू सोलगावातील सर्व ग्रामपंचायतींनी रिफायनरीविरोधी ठराव एकमताने मंजूर केले व याच चाळीस ग्रामपंचायतींच्या पंचक्रोशीतले लोक, महिला बापड्या आंदोलनात उतरल्या आहेत. या सर्व गावांत आता पोलिसी छावण्या पडल्या असून गावांची व लोकांची नाकेबंदीच केली गेली आहे. रात्री-अपरात्री सायरन वाजवीत पोलिसांच्या गाड्या फिरवून जी दहशत निर्माण केली जात आहे, ही काय लोकशाही म्हणावी? असा थेट सवाल सामनातून करण्यात आलाय.