राणेंचा विजय म्हणजे मरतुकडी म्हैस गाभण राहावी असा; सामनातून घणाघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात भाजपच्या खासदारांचा आकडा ९ वर आला. या नऊमधले काही जण तर घातपाताने किंवा अपघाताने जिंकले. त्यातील एक महामानव म्हणजे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खा. नारायण राणे हे आहेत. राणे हे काही जिंकण्याच्या स्थितीत नव्हते. मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा त्यांचा विजय आहे असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाने भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर टीकेचा बाण सोडला आहे. तसेच मनुष्य विजयाने नम्र होतो. राण्यांचे उलटे आहे. ते विजयाने हिंस्र व बेफाम होतात असेही सामनातून म्हंटल आहे. सामना अग्रलेखात नारायण राणे यांच्यावर सडकून टीका करनारा लेख लिहण्यात आला असून राणे कुटुंबीय आता त्यावर काय प्रत्युत्तर देतात हे पाहायला हवं.

सामना अग्रलेखात नेमकं काय म्हंटल?

श्रीमान राणे यांनी दावा केला आहे की, “लोकसभा निवडणुकीत कोकणातील शिवसेना आपण संपवली. यापुढे कोकणात कुणाला थारा देणार नाही. आमच्या आडवे कोण आले तर त्यांची जागा दाखवून देऊ.” नारोबांचे हे फूत्कार भाजपच्या अहंकारी वृत्तीस साजेसे आहेत. काही लोकांना ‘जय’ विनम्रपणे स्वीकारता येत नाही. त्यातले हे महाशय आहेत. राणे हे आधीच्या मोदी सरकारात सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग खात्याचे मंत्री होते. नव्या रालोआ मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्या अतिसूक्ष्म अकलेस झिणझिण्या आल्या व त्यातूनच ‘शिवसेना संपली, संपवली’ अशी भाषा बोलू लागले. राणे हे पुन्हा मंत्री झाले नाहीत, ही त्यांची योग्यता. (‘लायकी’ हा शब्द अधिक उचित आहे.) राणे हे कधीकाळी शिवसेनेत होते. शिवसेनेत मुख्यमंत्रीपदापर्यंत सर्व पदे भोगून त्यांनी पक्ष सोडला. राणे हे शिवसेनेमुळे आर्थिकदृष्ट्या संपन्न झाले. त्यांच्या घरावर सोन्याची कौले व डोक्यावर झुपकेदार केसांचा टोप चढला, पण खाल्ल्या घरचे वासे मोजावेत तसे त्यांचे वर्तन घडले.

राणे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये व कॉंग्रेसमधून भाजपमध्ये गेले. भाजपमध्ये जाताना त्यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर घाणेरडी टीका केली. खासगीत ते भाजप नेत्यांवरही हवे ते बोलतात. मोदी यांनी त्यांना आता मंत्री केले नाही व खासदार होऊनही बेकारीचे जिणे आल्याने मोदी विरोधाची उबळ बाहेर काढून शिवसेना संपविण्याची भाषा करीत आहेत. राणे यांच्याकडे पाहता त्यांची प्रकृती थोडी नाजूक झालेली दिसते. त्यामुळे त्यांना विजयाचे अजीर्ण झाले. असा अजीर्णाचा त्रास राणे यांना यापूर्वी अनेकदा झाला, पण या पोटदुखीवर शिवसेनेनेच जालीम उपाय वेळोवेळी केला. शिवसेनेने राणे व त्यांच्या टोळय़ांचा कोकणातील दहशतवाद मोडून त्यांचा पराभव केला. राणे यांना शिवसेनेने कोकणातही पाडले व मुंबईतही पराभूत केले. (येथे ‘गाडले’ हा शब्द अधिक उचित आहे.) त्यामुळे शिवसेना संपविण्याची भाषा करणाऱ्यांना अनेकदा कशी माती खावी लागली हे कोकणची जनता जाणते.

राणे यांना 4,48,514 मते, तर शिवसेनेच्या विनायक राऊत यांना 4,00,656 मते मिळाली. म्हणजे स्वतःस महान नेते वगैरे समजणाऱ्या राण्यांना पन्नास हजारांचीही आघाडी मिळालेली नाही. पैशांचा खेळ प्रशासन-पोलिसांच्या सहकार्याने झाला नसता तर राणे किमान दीड-दोन लाखांच्या फरकाने पराभूत झाले असते, पण पन्नास हजारांनी जिंकलेले राणे हे ‘कोकण’ दिग्विजयाच्या वल्गना करीत आहेत. राणे स्वतः कसेबसे जिंकले, पण भाजप हरला. राणे ज्या पक्षात जातात त्या पक्षाची महाराष्ट्रात हीच अवस्था होते, त्या पक्षाचा पराभव होतो, असे राणे यांचे सध्याचे सहकारी दीपक केसरकर यांनी सांगितले ते तंतोतंत खरे ठरले. शिवसेनेचा पराभव करणे राणे यांच्या सारख्यांना कधीच जमणार नाही. एखाद्या पराभवाने खचणारी व मागे हटणारी शिवसेना नाही. राणे व त्यांच्या कुटुंबास शिवसेनेने तीनदा धूळ चारली. चौथ्यांदाही पराभव होईल. मनुष्य विजयाने नम्र होतो. राण्यांचे उलटे आहे. ते विजयाने हिंस्र व बेफाम होतात.