हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशातील लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. या दाव्यामध्ये त्यांनी “निवडणुक झाल्यानंतर ठाकरे-शिंदे एकत्र आल्यास आश्चर्य मानू नका” असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर, उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) एकनाथ शिंदेंसोबत (Eknath Shinde) समझोता झाला आहे. असा खुलासा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. त्यामुळे आता आंबेडकरांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
ठाकरे गट आणि शिंदे गट एकत्र येण्याबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, “उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने त्यांचा उमेदवार कल्याणमध्ये लढणार आहे की नूरा कुस्तीचा आहे एवढे सांगावं. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या दोघांमध्ये समझोता झाला असून निवडणुकीनंतर एकत्र आले तर आश्चर्य मानू नका.”
त्याचबरोबर, “उद्धव ठाकरे अडचणीत आले तर मी त्यांना मदत केल्याशिवाय राहणार नाही असं नरेंद्र मोदी म्हणाले. ठाकरेंच्या सेनेने भाजप सोबत समझोता केला आहे, काँग्रेसने देखील त्यांच्या सेनेपासून फारकत घेतली आहे. उद्धव ठाकरे हे काँग्रेसचा प्रचार करत नाहीत हे काँग्रेसला लक्षात आलं आहे. ठाकरेंच्या सेनेने काँग्रेसला फसवलं आहे.” असा थेट आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
इतकेच नव्हे तर, “जो धर्मवादी आहे, जो भाजपासोबत पुन्हा जाणार नाही असं लिहून देणारा नाही अशा उद्धव ठाकरेंकडे कुठली वॉशिंग मशिन आहे, ज्यातून ते धर्मवादीतून सेक्युलरवादी झाले. ही कुठली वॉशिंग मशिन आहे ती आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही सर्व धर्मवाद्यांना वॉशिंगमध्ये टाकून सेक्युलरवादी बनवू” अशी खोचक टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.