मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, उद्यापासून वाहतुकीसाठी खुलेल ठाणे खाडीवरील तिसरा पूल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सायन-पनवेल महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी गुरुवारचा दिवस सुखद ठरणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) ठाणे खाडीवर बांधण्यात आलेला तिसरा पूल ५ जूनपासून वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय घेतला आहे. हा पूल काही आठवड्यांपूर्वीच पूर्ण झाला होता, मात्र उद्घाटनाची प्रतीक्षा सुरु होती. अखेर 5 जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन माध्यमातून या पुलाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.

ऑनलाईन उद्घाटनाचा निर्णय

५ जून रोजी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन होत असून, त्याच कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री इगतपुरी येथून ऑनलाईन पद्धतीने ठाणे खाडी पूल-३ चेही उद्घाटन करणार आहेत. समृद्धी महामार्गाचा इगतपुरी ते ठाणे असा ७६ किलोमीटरचा शेवटचा टप्पा पूर्ण झाला आहे.

कोणाला होणार फायदा?

सायन-पनवेल महामार्ग हा मुंबई, नवी मुंबई आणि पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाचा मार्ग आहे. गेल्या काही वर्षांत या महामार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे ठाणे खाडीवर दोन अतिरिक्त पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मुंबईहून पनवेलकडे जाणाऱ्या दिशेचा पूल पूर्वीच सुरू करण्यात आला आहे. आता पनवेलहून मुंबईकडे येणाऱ्या दिशेचा पूल (ठाणे खाडी पूल-३) गुरुवारी म्हणजेच ५ जूनपासून सुरु होणार आहे.

ट्रॅफिक जाममधून दिलासा

मुंबईहून पनवेलकडे जाणारी वाहतूक सध्या नव्या पुलामुळे सुरळीतपणे सुरू आहे. मात्र पनवेलहून मुंबईकडे येणाऱ्या वाहनांना अजूनही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. हा तिसरा पूल सुरु झाल्यानंतर या दिशेची वाहतूकही सुकर होणार असून वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.