संशोधक विद्यार्थीनीकडून 50 हजार मागणाऱ्या विद्यापीठातील ‘त्या’ प्राध्यापिका निलंबित

औरंगाबाद – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिक्षणशास्त्र विभागाच्या प्रमुखाकडून गाईडसाठी संशोधक विद्यार्थिनीकडे 50 हजारांची लाच मागण्यात आल्याची एक ऑडीओ क्लिप बुधवारी समोर आल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी शिक्षणशास्त्र विभागप्रमुख डॉ. उज्ज्वला भडंगे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.

डॉ. उज्वला भडंगे यांनी शिक्षणशास्त्र विषयामध्ये संशोधन करत असलेल्या विद्यार्थिनीकडे आता 25 हजार आणि व्हायवाच्या वेळेस गाईडला देण्यासाठी 25 हजार रुपये असे 50 हजार रुपये लाचेची मागणी केल्याची ऑडीओ क्लिप बुधवारी समाज माध्यमांवर व्हायरल झाली. विद्यार्थिनीने याप्रकरणी कुलगुरू आणि पोलिसांकडे तक्रार दिली.

यानंतर काल विद्यापीठातील सर्वपक्षीय विद्यार्थी संघटनांनी आक्रमक होत डॉ. भडंगे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत डॉ. उज्वला भडंगे यांचे विभाग प्रमुख पद काढून घेऊन निलंबित केले आहे. तसेच प्रकरणाची एक समिती चौकशी करेल. समितीने दिलेल्या अहवालानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती कुलगुरू येवले यांनी दिली आहे.