सातारा | ‘बोल बजरंग बली की जय,’‘सीताराम की जय,’‘प्रभु रामचंद्र की जय’ च्या जयघोषात गुलाल-खोबर्याची उधळण करीत हजारो भाविक-भक्तांच्या साक्षीने तीर्थक्षेत्र चाफळला श्रीराम रथोत्सव मंगळवारी सुर्योदयाबरोबर साजरा करण्यात आला. समर्थ रामदास स्वामींनी सन 1648 मध्ये सुरु केलेला रामनवमी उत्सव तीर्थक्षेत्र चाफळ येथे आजही अखंडितपणे सुरु आहे. चैत्र शुध्द एकादशीला श्रीरामनवमी उत्सवाची सांगता होत असते. यावेळी समर्थ वंशजांच्या हस्ते चाफळसह भागातील बारा बलुतेदार व मानकरी यांचा मानाचे नारळ देऊन गौरव करण्यात आला.
रथासमोर चांदीची पालखी, समर्थाचे वंशज, सुवासिक फुलांच्या माळा, मानाच्या सासनकाठ्या, सजवलेले घोडे, शेकडो दिवट्या, उत्सवाचे मानकरी आणि हजारो भक्त प्रभुरामाचा जयजयकार करीत रथ ओढत होते. मंदीरपासून निघालेला रथोत्सव सकाळी सुर्योदयावेळी महारुद्र स्वामींच्या समाधी मंदीर बसस्थानकाजवळ पोहचल्यानंतर तेथून परत पुन्हा मंदीराच्या पायथ्यापर्यत आणण्यात आला. रथोत्सवासाठी चाफळसह परिसरातील भाविकांनी हजेरी लावली होती.
जिल्हयातील तीर्थक्षेत्र चाफळ येथील 375 वा प्रभू राम यांचा रथोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. आज पहाटे 6 वाजून 30 मिनिटांनी रथोत्सवास प्रारंभ झाला. यावेळी चाफळ विभागासह जिल्ह्याच्या विविध ठिकाणाहून रथोत्सवास साठी भाविकांनी हजारोच्या संख्येने अलोट गर्दी केली होती. गुलाल खोब-याची उधळण करत श्रीराम नामाच्या गजरात आणि ढोल ताशांच्या गजरात रथ यात्रा गावातून संपन्न झाली.
गेल्या दोन वर्षात साध्या पध्दतीने श्रीराम नवमी साजरी करण्यात आली होती. मात्र, आता काेराेनाचे संकट दूर झाल्याने या रथ यात्रेत माेठ्या प्रमाणात भाविक सहभागी झाले हाेते. रामनामाचा जप करीत काही जण बेधुंद नाचत हाेते.