औरंगाबाद – राज्यातील मंदिरे सर्व भाविकांसाठी उघडण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज औरंगाबादेतील सुपारी हनुमान मंदिर परिसरात जोरदार आंदोलन करण्यात आले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटे दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून बंद केलेले मंदिरांचे द्वार अद्याप उघडण्यात आलेले नाहीत. या मुद्द्यांवरून सत्ताधारी महा विकास आघाडी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक सुरू आहे. मनसेच्या या आंदोलनावर औरंगाबादेतील शिवसेना नेत्यांनी मात्र बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे.
औरंगाबादेतील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे यांनी मनसेच्या आंदोलनाची खिल्ली उडवली आहे मनसेमध्ये मंदिरे उघडण्याची हिम्मत नाही मनसेकडून मंदिर उघडण्यासाठी सुरू केलेले आंदोलन म्हणजे भाजपने स्पॉन्सर केलेला कार्यक्रम आहे त्यांनी आमच्या नादी लागू नये अशी टीका चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांनी केली आहे यामुळे शहरातील राजकीय वातावरण तापले आहे.
दरम्यान मंदिरे उघडण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज औरंगाबादेत घंटानाद आंदोलन करण्यात आले. गुलमंडी परिसरातील सुपारी हनुमान मंदिरासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी गुलमंडीवर शिवसेना विरुद्ध मनसे असे चित्र पाहायला मिळाले.