परभणी | जिल्ह्यात जिंतूर तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असून नदीला पुर आला आहे. या पुराच्या पाण्यामुळे उपचारासाठी शहरातील रुग्णालयात जाऊ न शकल्याने एका गर्भवती महिलेच्या बाळाचा गर्भातच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली.
गेल्या दोन दिवसापासून तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून तालुक्यातील सर्वच नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहे. या पावसामुळे अनेक रस्ते वाहून गेले आहे. काही नद्यांचे पुलांची उंची कमी असल्याने या पुलावरून तीन दिवसापासून सतत पाणी वाहत आहे. तालुक्यातील शहरातून वाहत असलेली उलटी नदी बलसा शिवारातून वाहते. या नदीवरील पुलाची उंची कमी असल्यामुळे थोडा जरी पाऊस झाला तर पुलावरून पाणी वाहून जवळपास 5 गावाचा संपर्क तुटतो. पाचलेगाव येथील एका विवाहित महिलेस वेदना होत असल्याने तिच्या कुटुंबाने तिला उपचारासाठी शहरात येत होते.
मात्र नदीला पूर आल्याने त्यांनी विवाहितेला बैलगाडीत अकोली मार्गे शहरात आणले मात्र तोपर्यंत बराच वेळ निघून गेला होता. त्यामुळे बाळाचा मृत्यू गर्भातच झाला होता यामुळे विवाहेतेच्या जीवालाही धोका होता. करपरा नदीलाही पूर आल्याने परभणीकडे जाणारी सर्व वाहतूक बंद होती. त्यामुळे या विवाहितेला औरंगाबाद येथे नेऊन तिच्या गर्भातून ते बाळ काढून तिचा जीव वाचवण्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांना यश आले. नदीवरील कमी उंचीच्या पुलामुळे एका आईचे बाळ दगावल्याने हळहळ व्यक्त होत आहे.