सातारा प्रतिनिधी । कराड येथील मुख्य बाजारपेठेत रविवारी भरदुपारी होंडा कंपनीच्या ऍक्टिवा दुचाकीने अचानक पेट घेतल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. या आगीत दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली. अचानक लागलेल्या या आगीमुळे दत्ता चौक ते आझाद चौक रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की कराड येथील मुख्य बाजारपेठेमध्ये रविवारी दुपारी एका ऍक्टिव्हाने पेट घेतला. अचानक लागलेल्या या आगीने अवघ्या काही मिनिटात भीषण रूप धारण केले. यामध्ये दुचाकी पूर्णपणे जाळून खाक झाली आहे. दत्त चौका लगतच्या मयूर एजन्सीसमोर एका ग्राहकाने दुचाकी पार्कींग केली होती. दुचाकी पार्क करून गाडी मालक जवळच्या दुकानात गेला होता. त्याचवेळी पार्कींगमध्ये लावलेल्या दुचाकीतून अचानक धूर येऊ लागला. काही समजायच्या आतच दुचाकीने भयंकर पेट घेतला.
यामध्ये क्षणार्धात दुचाकी जळून खाक झाली. या घटनेमुळे दत्ता चौक ते आझाद चौक रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून कराड नगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. यानंतर अग्निशामक दलाकडून ही आग आटोक्यात आणली गेली. दरम्यान दुचाकीला लागलेल्या आगीचे कारण अदयाप समजु शकले नाही.