सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

वाई येथील एमआयडीसीतील दोन बेपत्ता कामगारा पैकी एकाचा मृतदेह धोम डाव्या कालव्यात आढळून आला तर दुसऱ्याचा शोध वाई पोलिस घेत आहेत. या घटनेची नोंद वाई पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.

वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाई येथील यश इंडस्ट्रीजमध्ये काम करणारे नरेश धर्मदासजी (वय- 20, रा- ३२ नॉर्थ वेस्ट दिल्ली), त्याचा मित्र बिरु श्रीपाल असे दोघेजण कामाला होते. पण इंडस्ट्रीज मध्ये नेमून दिलेले काम पसंत नसल्याने ते दोघेही दि. 6 जूनला दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कामावरुन कंपनीच्या बाहेर निघून गेले होते.

संध्याकाळ पर्यंत ते पुन्हा कंपनीत परत न आल्याचे कंपनीचे मॅनेजर असलेले रणजित बबन मंडले यांना समजले. त्यांनी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन त्या बेपत्ता कामगारांचा शोध घेतला. दोघेही मिळुन न आल्याने ते दोन्ही ही कामगार बेपत्ता असल्याची तक्रार वाई पोलिस ठाण्यात दिली तक्रार दिली. नंतर काही वेळातच कंपनीच्या सिक्युरिटीचा फोन आला, की रविवार पेठ मोती बाग येथील धोम डाव्या कालव्यात एक मृतदेह पाण्याच्या प्रवाहा बरोबर वाहत आलेला आहे. आपण दाखल केलेल्या मिसींग पैकी एका मुलाचा हा मृतदेह असावा असे सांगीतले. नंतर मॅनेजर घटना स्थळावर तातडीने दाखल झाले, त्यांनी पाहिले असता कामगार नरेश धर्मदासजी याचाच मृतदेह असल्याची त्यांची खात्री झाली. तो मित्र बिरु श्रीपाल याच्या सोबत कालव्यात आंघोळीसाठी गेला होता. त्याला पोहता येत नसल्याने त्याचा कालव्यात  बुडुन मृत्यू झाला. पण त्याचा मित्र असलेला बिरु श्रीपाल हा अद्याप बेपत्ता आहे. या घटनेची माहिती वाई पोलिस ठाण्यात कळविल्यावर नंतर तातडीने प्रशांत शिंदे धुळे, किरण निंबाळकर हे पोलिस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह कालव्यातून बाहेर काढुन त्याचा पंचनामा केला आहे. तर दुसऱ्या कर्मचार्‍याचा पोलिस  शोध घेत आहेत. रात्री अंधार पडल्याने त्यांचा शोध थांबविण्यात आला. याची तक्रार रणजित बबन मंडले यांनी वाई पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. याचा अधिक तपास सहाय्यक फौजदार आर.झेड. कोळी करीत आहेत.