सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
कातरखटाव येथे भरदिवसा झालेल्या घरफोडीतील संशयिताला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. मात्र, ही चोरी फिर्यादीच्याच मुलाने केल्याचे समोर आले आहे. शेअर मार्केटच्या गुंतवणुकीत झालेल्या आर्थिक नुकसानीमुळे मुलाने स्वतःच्या घरातील 35 तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. पोलिसांनी दोन तासाच्या आतच या चोरीचा भांडाफोड केला. तेजस तानाजी देशमुख (वय- 20, रा. कातरखटाव, ता. खटाव) असे संशयिताचे नाव आहे. तर तानाजी देशमुख असे फिर्यादीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कातरखटाव येथील तानाजी देशमुख यांच्या विठ्ठल मंदिराजवळील केशव निवास या घरातून शुक्रवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास भरदिवसा तब्बल 35 तोळे सोन्यासह चांदीचा ऐवज व 30 हजार रूपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली होती. भरवस्तीत झालेल्या या घरफोडीमुळे नागरिकांत भितीचे वातावरण पसरले होते. घटनास्थळी ठसे तज्ञ व श्वान पथकही तैनात करण्यात आले होते.
पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान करत घरातील लोकांची चौकशी व जबाब घेतल्यानंतर या प्रकरणात घरातील कोणाचा तरी हात असल्याचा संशय त्यांना येऊ लागला. त्यामुळे पोलिस उपनिरीक्षक शितल पालेकर यांनी फिर्यादीचा मुलगा तेजस याला अधिक चौकशीसाठी मायणी पोलीस दूरक्षेत्रात नेले. त्यावेळी त्याच्याकडे अधिक चौकशी करता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच त्याने ही चोरी केल्याचे मान्य केले.
एका मित्राच्या साथीने त्याने शेअर मार्केटमध्ये आर्थिक गुंतवणूक केली होती. त्यात आलेल्या आर्थिक नुकसानीमुळे तेजसने चोरी केल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी आणखी एका संशयीतास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सपोनि मालोजीराव देशमुख, संतोष तासगावकर, पोलिस उपनिरीक्षक शीतल पालेकर, पोलिस हवालदार अमोल माने, दिपक देवकर, माळवे, बनसोडे यांनी तपास कामी परिश्रम घेतले. तपास सपोनि मालोजीराव देशमुख करत आहेत.