लाचखोर तलाठ्यास खासगी मदतनीतासह रंगेहाथ पकडले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

आजोबांच्या जमिनीचा सातबारा उताऱ्याचा सर्च रिपोर्ट देण्यासाठी दोन हजारांची लाच मागणाऱ्या मसूर येथील तलाठ्यासह त्याच्या खासगी मदतनीसाला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने पकडले. मसूर येथील तलाठी कार्यालयात बुधवारी दुपारी कारवाई झाली. नीलेश सुरेश प्रभुणे (वय 45, रा. मलकापूर, ता. कऱ्हाड) असे तलाठ्याचे, तर रविकिरण अशोक वाघमारे (वय 27, रा. मसूर) असे त्याच्या मदतनीसाचे नाव आहे.

याबाबत लाचलुचपत विभागाची माहिती अशी, मसूर येथील युवकाने त्याच्या आजोबांच्या नावाने मसूर येथील त्यांच्या जमिनीचा सातबाराचा उतारा व त्याच्या सर्च रिपोर्टसाठी अर्ज केला होता. बरेच दिवस त्याला ती कागदपत्रे देण्यासाठी टाळाटाळ केली जात होती. युवकाने मागणी करूनही तलाठ्यासह त्यांचा मदतनीस कागदपत्रे देत नव्हता. तेव्हा कागदपत्रे हवी असल्यास काही रक्कम द्यावी लागेल, असे सांगितले. त्यानुसार दोघांतर्फेही तक्रारदार युवकाकडे दोन हजारांच्या लाचेची मागणी त्यांनी केली. त्यानुसार तक्रारदार बुधवारी दुपारी पैसे देऊन कागदपत्रे नेणार होता. त्यापूर्वी संबंधित युवकाने त्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे त्यांची तक्रार केली. त्यानुसार लाचलुचपत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याचा सापळा रचला.

पोलिस उपअधीक्षक अशोक शिर्के, हवालदार राजे, काटकर, येवले, भोसले, अडागळे आदींच्या पथकाने सापळा रचला. तक्रारदाराने त्यांची कागदपत्रे नेण्यास आला होता. त्या वेळी त्याने दिलेले दोन हजार रुपये दोघांतर्फे एकाने स्वीकारले. त्यावेळी तेथे छापा टाकून स्वीकारलेल्या रकमेसह संबंधितांना लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले. तलाठी प्रभुणे मलकापूर येथे राहतात. मात्र, ते मसूरचे तलाठी आहेत. त्यांचा मदतनीस रविकिरण वाघमारे हा मूळचा मसूरचाच आहे. त्या दोघांच्याही घरी तपासणी होणार आहे, असे लाचलुचपत विभागाने स्पष्ट केले.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment