कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
निवडणूक आयोगाकडून आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी गट आणि गण आरक्षण जाहिर झाले आहे. कराड तालुक्यातील कार्वे प. स गणासाठी सर्वसाधारण आरक्षण आहे. या निवडणुकीसाठी केवळ राजकीय पार्श्वभूमी न पाहता कार्वे गणाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी सामाजिक कार्यकर्त्यालाच द्यावी, अशी अपेक्षा मतदारांच्याकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे टेंभू येथील सुहास बाबर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारी जाहीर केली जाईल, अशी चर्चा सध्या कार्वे गणातील मतदारांमध्ये आहे.
टेंभूतील सुहास सदाशिव बाबर हे सामाजिक कार्यात सदैव सक्रिय असतात. त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून गेली दहा वर्षांपेक्षा जास्त काळ विविध प्रकारे समाजाची सेवा केलेली आहे. कार्वे विभागातील नागरिकांच्या प्रशासकीय समस्या सोडवणे, त्यांच्यापर्यंत राज्य शासनाच्या किंवा तालुकास्तरीय असणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजना पोहोचवण्यासाठी आवश्यक ती मदत करणे मार्गदर्शन करणे, अशा पद्धतीची कामे सातत्याने केलेली आहेत.
टेंभू हे गाव हे कार्वे गणामध्ये समाविष्ट आहे. परंतु आजपर्यंत कधीही टेंभू गावाला पंचायत समिती सदस्य मिळालेला नाही. त्यामुळे मोठ्या लोकसंख्येच्या या गावात अनेक शासकीय योजना पोहोचू शकत नाहीत. परिसरातील कोरेगाव, सयापुर या गावांचे मध्यवर्ती गाव म्हणून टेंभूची ओळख आहे. सुहास बाबर यांचा टेंभुसह कार्वे गणातील सर्व गावांमध्ये मोठा जनसंपर्क आहे. या गावांमध्ये त्यांनी शेकडो लोकांची वेगवेगळ्या प्रकारची कामे केली आहेत. प्रामुख्याने युवक वर्गात त्यांची मोठी लोकप्रियता आहे. या गोष्टीचा त्यांच्या उमेदवारीसाठी खूप फायदा होऊ शकतो. या सर्व गोष्टींचा विचार करुन बाबर यांना अधिकृत उमेदवारी दिल्यास एक तरुण कार्यकर्ता पंचायत समिती सभागृहाचा सदस्य म्हणून अभ्यासपूर्ण आणि निर्भीडपणे कामकाज पाहील. या गोष्टींचा विचार करुन त्यांच्या आजवरच्या कामाची दखल घेऊन त्यांना कोणत्याही प्रमुख राजकीय पक्षाने कार्वे गणातून उमेदवारी द्यावी, अशी अपेक्षा नागरिकांच्याकडून व्यक्त केली जात आहे.