सातारा प्रतिनिधी शुभम बोडके
आपल्याला सर्वत्रच पोलीस अशी पाटी लावलेल्या विविध गाड्या बघायला मिळतील, परंतु आता पोलीस म्हणून गाडीवर खोटी पाटी लावताय तर सावधान! ; कारण आता अशा खोट्या पाट्या लावणाऱ्यांवर उच्च न्यायालयाने कारवाईचे आदेश दिले आहेत. पोलिसांच्या नावाचा वापर करून खाजगी वाहनांवर पोलीस अशी पाटी लावणाऱ्या व्यक्तींविरोधात तथा वाहन धारकांविरोधात तक्रारी येत असतात. यामुळे सामान्य नागरिक आणि पोलीस यांच्यात फूट पडण्याची भीती व्यक्त करतानाच नाराजीचा सूर आळवत न्यायालयाने अशा खोट्या पोलिसांच्या नावाचा गैरवापर करत खोट्या पाट्या लावून फिरणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत.
सर्व नागरिकांना समान कायदा या तत्त्वानुसार पोलिसांनीच कायद्याचे उल्लंघन करणे हे पोलिसांची प्रतिमा मलिन करण्यासारखे आहे. अशा प्रकारे पोलीस ही पाटी लावलेली वाहने नाकाबंदी तसेच सुरक्षा तपासणी न होता सोडली जावू शकतात. त्यामुळं पोलिसांच्या नावाचा चुकीचा वापर होऊन नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची संभावनाही न्यायालयाने व्यक्त केली. पोलीस अशी पाटी लावलेल्या वाहनांमार्फत घातपात होऊ शकतो, अशी शक्यताही परिपत्रकात व्यक्त करण्यात आलेली आहे.
प्रभारी पोलीस निरीक्षक यांना निर्देश देताना न्यायालयाने म्हटले आहे की, त्यांच्या अधिपत्याखाली अंमलदार व अधिकारी यांना त्यांच्या खाजगी वाहनांवर असलेल्या पोलीस नावाच्या पाट्या हटवण्याबाबत अवगत करावे. जर पोलिसांनीच नियमभंग केला तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देशही, यावेळी न्यायालयाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात दिलेले आहेत. याबाबत पोलिसांची सलग चार दिवस परेड घेऊन त्यांना याबाबत अवगत करावे अशी सूचनाही यामध्ये केलेली आहे.