औरंगाबाद – महानगरपालिका प्रशासनाने कोरोना च्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत तब्बल 750 कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावर घेतले होते. या कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा 31 ऑगस्टपासून थांबवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यानुसार काल रात्री उशिरा मनपा प्रशासन यांनी तब्बल 614 कंत्राटी कर्मचाऱ्यांना नारळ देण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोना च्या दुसऱ्या लाटेत इतक्या मोठ्या प्रमाणावर कंत्राटी कर्मचारी नेमले असले, तरी देखील ते कमीच पडत होते कारण रुग्णसंख्या अति वेगाने वाढली होती. शहरात तब्बल 23 कोवीड केअर सेंटर वर रुग्णांवर उपचार सुरू होते. तसेच गंभीर रुग्णांना खासगी रुग्णालयात दाखल करावे लागत होते. कोरोनाच्या मागील दोन लाटांचा अनुभव लक्षात घेता 750 पैकी किमान 50 टक्के कर्मचारी तूर्त कमी करावेत असा प्रस्ताव आरोग्य विभागामार्फत प्रशासकांना सादर करण्यात आला होता.
यातच काल रात्री उशिरा 614 कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा थांबवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कोरोनाशी संबंधित विविध कामे करण्यासाठी आता फक्त 166 कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर ठेवण्यात आले आहेत. यामध्ये 8 एमबीबीएस, 5 आयुष, 1 हॉस्पिटल मॅनेजर, 50 नर्सिंग स्टाफ, 2 एक्स-रे टेक्निशियन, 2 ईसीजी टेक्निशियन, 7 डाटा एंट्री ऑपरेटर, 10 वॉर्डबॉय तसेच 10 महिला व सेविका आदींचा समावेश आहे.