हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| प्राध्यापक पदासाठी सर्वात आवश्यक असणारी सेट परीक्षा येत्या 7 एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने सेट परीक्षा घेतली जाईल. मुख्य म्हणजे, यावर्षी पारंपारिक पद्धतीने घेण्यात येणारी सेटची 39 वी परीक्षा शेवटची परीक्षा असणार आहे. यानंतर 40 वी सेट परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यायची आहे, त्यांना आतापासूनच अभ्यासाला लागावे लागणार आहे.
दरवर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून 1995 पासून महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी सेट परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा एकूण 32 विषयांसाठी घेण्यात येते. यंदा ही परीक्षा 17 शहरांमधील जवळपास 262 परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. जो विद्यार्थी या परीक्षेमध्ये चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण होतो त्याला राज्यांतील कोणत्याही विद्यापीठामध्ये सहायक प्राध्यापक पदासाठी अर्ज करता येऊ शकतो.
कोणत्याही विद्याशाखेतील पदव्युत्तर पदवी परीक्षेत 55 टक्के गुण (राखीव 50 टक्के) मिळवलेला विद्यार्थी किंवा शेवटच्या वर्षाला शिकणारे विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करू शकता. ही परीक्षा इंग्रजी आणि मराठी अशा दोन भाषेत घेण्यात येत. अद्याप या परीक्षेसाठीच्या अर्जाची तारीख जाहीर करण्यात आली नाही. मात्र ती तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे यांनी दिली आहे. यापूर्वीची सेट परीक्षा 23 मार्च 2023 रोजी घेण्यात आली होती. त्यावेळी एक लाख 3 हजार विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते.