औरंगाबाद | तोल जाऊन पडल्याचे सांगत मद्यपी पित्याला मुलाने अडीच महिन्यांपूर्वी घाटीत दाखल केले होते. मात्र, त्या मद्यापीचा मृत्यू झाला होता. दरम्यान, त्याच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा दिसून येत असल्याने एमआयडीसी वाळूज पोलिसांनी घाटीच्या डॉक्टरांकडून अहवाल मागवताच त्या मद्यपीचा मारहाणीत मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यावरून पोलिसांनी कुटुंबियांना ताब्यात घेत कसून चौकशी केली असता दारू पिऊन दररोज घरात कुटुंबियांना मारहाण करत असल्याने मुलानेच रागाच्याभरात त्याला मारहाण केल्याची कबुली दिली आहे. त्यातच त्याचा मृत्यू झाला. राजेश रामकृष्ण मुसळे (वय 55, रा. साई नगर. सिडको वाळूज महानगर) असे मयताचे नाव आहे. हि घटना 7 एप्रिल रोजी दुपारी दीडच्या सुमारास घडली होती.
याप्रकरणी पोलिसांनी ऋषीकेश राजेश मुसळे (वय 23) याला अटक केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिली. घाटी पोलीस चौकीतून एमआयडीसी वाळूज पोलिसांना 7 एप्रिल रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास कळविण्यात आले की, राजेश मुसळे यांना ऋषीकेश मुसळे याने घाटीच्या अपघात विभागात दाखल केले आहे. दुपारी दीडच्या सुमारास घरी अचानक तोल जावुन पडल्याने बेशुध्द झाल्याने उपचारकासाठी घाटीत दाखल केले. डॉक्टरांनी तपासुन रात्री नऊच्या सुमारास मयत घोषीत केले आहे असे सांगितले. त्यावरुन एमआयडीसी पोलिसांनी राजेश मुसळे यांच्या अकस्मात मृत्यूची नोंद घेऊन तपास उपनिरीक्षक पागोटे यांच्याकडे दिला. त्यानंतर पागोटे यांनी राजेश यांच्या मृतदेहाचा 8 एप्रिल रोजी पंचनामा केला. तेव्हा अंगावर, डोळ्याच्या भुवईजवळ, गालावर मानेच्या मागील बाजुस, पोटावर व इतर काही ठिकाणी मारहाणीच्या व ओरखडल्याच्या जखमा दिसुन आल्या. तसेच डॉक्टरांच्या शवविच्छेदन अहवालात डोक्याला व छातीला मुक्का मार असल्याचा अभिप्राय दिला होता.
त्यामुळे पोलिसांनी घाटीच्या वैद्यकीय अधिकारी यांना 22 एप्रिल रोजी पत्र दिले. त्यात राजेश यांच्या डोळे, मान, हातपाय, पाठ व पोटावर असलेले जखमेचे व्रण हे मारहाणीत झाले आहेत किंवा कसे ? तसेच सदर जखमा या अपघातामुळे अथवा तोल जावुन पडल्याने झाल्या आहे काय ? मृत्यु हा अपघातामुळे अथवा मारहाणीमुळे झाला आहे काय ? याबाबत स्पष्ट अभिप्राय मागवण्यात आला. परंतु, वैद्यकिय अधिकाऱ्यांनी अभिप्राय न दिल्याने पुन्हा 14 मे रोजी पत्र पाठवून तात्काळ अभिप्राय देण्याचे कळविले. त्यांनतर घाटीकडून 18 मे रोजी अभिप्राय दिला त्यात राजेश यांचा मृत्यु हा इतर कोणी व्यक्तीने केलेल्या मारहाणीमुळे झालेला असावा असे कळविले.