कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
गेल्या अडीच वर्षांपूर्वी जनमताच्या विरुद्ध जात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमुळे कराड दक्षिणमध्ये विकासाची गंगा रखडली होती. पण राज्यात नुकतेच पुन्हा भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आल्यामुळे, आता येणाऱ्या अडीच वर्षात कराड दक्षिणचा विकासाचा बॅकलॉग भरुन काढण्याचा कसोशीने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांनी दिली. वाठार (ता. कराड) येथे विविध विकासकामांच्या भूमीपूजन व उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत जलजीवन मिशन अंतर्गत वाठार गावासाठी मंजूर झालेल्या ५.५० कोटी रुपयांच्या २४ बाय ७ नळपाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन डॉ. भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी रोजगार हमी योजनेअंतर्गत रेठरे-वाठार शिव पाणंद रस्ता (१३ लाख ५८ हजार), मालखेड-वाठार शिव पाणंद रस्ता (१३ लाख २४ हजार), इनाम पाणंद रस्ता (७ लाख ३० हजार) अशा एकूण ३४ लाख रुपयांच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले. याप्रसंगी य. मो. कृष्णा कारखान्याचे संचालक दत्तात्रय देसाई, दयानंद पाटील, जि. प. सदस्य गणपतराव हुलवान, भाजप तालुकाध्यक्ष धनाजी पाटील, सरपंच शोभाताई पाटील, उपसरपंच सचिन पाटील आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉ. भोसले म्हणाले, की राज्यात भाजपा-शिवसेनेचे युतीचे सरकार पुन्हा सत्तेवर आले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात पुन्हा एकदा विकासाची गंगा गतिमान करण्यास प्रयत्नशील आहेत. नव्या सरकारने सत्तेवर आल्याबरोबर शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यास सुरवात केली आहे. लोकाभिमुख कारभार करणाऱ्या या सरकारच्या माध्यमातून कराड दक्षिणमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासनिधी आणण्याचा आमचा मानस असून, कराड दक्षिणमधील गावांच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.
दरम्यान, यावेळी डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते जि.प. सदस्य गणपतराव हुलवान यांच्या निधीतून मंजूर झालेल्या बाळोबा मंदिर सुशोभीकरण (९ लाख), स्मशानभूमी रंगकाम, श्री म्हसोबा मंदिर सोलर लॅम्प (२ लाख), श्री म्हसोबा मंदिर व हुनमान मंदिर सुशोभीकरण (३ लाख), श्री भैरोबा मंदिर बंदिस्त गटार बांधकाम (२ लाख), बेघर वस्ती व चर्मकार वस्ती येथे पाण्याच्या टाकीची उभारणी (३ लाख), राम मंदिर सुशोभीकरण (३ लाख), बौद्ध वस्ती शौचालय उभारणी (१.२० लाख), रेठरे रस्ता ड्रेनेज पाईपलाईन व काँक्रिटीकरण (१७ लाख) व एलईडी लॅम्प उभारणी (१.२० लाख), जि.प. शाळा किचन शेड (३लाख), हायमास्ट दिवा उभारणी (१.५० लाख) अशा एकूण ४८ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमीपूजन व उद्घाटनही करण्यात आले.
यावेळी कृष्णा सहकारी बँकेचे संचालक प्रमोद पाटील, हर्षवर्धन मोहिते, जयवंतराव भोसले नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन दत्तात्रय पाटील, सदाशिव भोसले, अभिषेक मोरे, ग्रा. पं. सदस्य अभिजित पाटील, मालखेडचे उपसरपंच युवराज पवार, सोसायटीचे चेअरमन बाजीराव माने, ओंकार पाटील, राहुल पाटील, उमेश मोहिते, धनाजी जाधव, अनिल मोहिते, तानाजी पाटील, देवानंद पाटील, महेश मोहिते, सागर साळुंखे, दिनकरारव मोरे, पांडुरंग पाटील, पांडुरंग गावडे, सुनील शिंदे, चंद्रकांत देसाई, जगन्नाथ देसाई, रमेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.