औरंगाबाद | राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने या पूर्वी काढलेले आदेश सहपत्रित करण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापना संदर्भातील या पुढील सर्व आदेश केवळ आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून निर्गमित केले जातील. स्वतंत्रपणे कोणताही विभाग या बाबतचे कोणतेही आदेश काढणार नाही, असा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला.
औरंगाबाद जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर, पोलीस निरीक्षक बी.पी. कोळी उपस्थित होते. जिल्हयामध्ये पूर्वीप्रमाणेच निर्बंध लागू राहतील. यामध्ये लग्न समारंभ केवळ खाजगी जागांमध्ये स्थानिक पोलीस स्टेशन अधिकारी यांची ना-हरकत प्रमाणपत्र घेऊन, स्थानिक स्वराज्य संस्था (ग्राम पंचायत, नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका) यांचेकडे परवानगीसाठी अर्ज सादर करावा. स्थानिक स्वराज्य संस्था यांनी दिलेली परवानगी अंतिम राहील. तसेच किमान (जास्तीत जास्त 50 लोक) उपस्थिती ठेवून विवाह नोंदणी कार्यालयात देखील नोंदविता येतील.
उपस्थितांची यादी नावे, पत्ता व मोबाईल क्रमांक यासह स्थानिक स्वराज्य प्राधिकरणाकडे सादर करणे बंधनकारक राहील. अंत्यविधीसाठी 20 व्यक्तींनाच उपस्थित राहण्याची परवानगी असेल. याचे नागरिकांनी काटेकोर पालन करणे अनिवार्य राहील. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतीशी संबंधित आस्थापना म्हणून सुरु ठेवता येईल परंतु या ठिकाणी कोविड-19 विषयक नियमांचे उल्लंघन दिसून आल्यास कोविड विषयक अधिसूचना लागू असे पर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती बंद करणे भाग पडेल असा असा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला. जिल्ह्यातील सर्व प्रकारची ऐतिहासिक स्थळे, वास्तू, संग्रहालये, प्रेक्षणीय स्थळे बंद राहतील.
अत्यावश्यक सेवेतील वाहतूक व्यवस्था, सार्वजनिक आणि वाहतूक व्यवस्था यापूर्वीच सुरु ठेवण्यात आलेली आहे. वाहतूक सुरळीत सुरु राहण्यासाठी या क्षेत्राशी निगडीत टायर विक्री, रिपेअर वर्कशॉप, सर्व्हीस सेंटर आणि स्पेअर पार्ट विक्री आस्थापना सर्व दिवशी सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत सुरु राहतील. चार्टर्ड अकाऊंटंट यांची कार्यालये सुरु राहतील, असेही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले. कोविड-19 चा संसर्ग वाढू नये, यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात शनिवार, रविवारी कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. नागरिकांनी अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. याबाबतचे आदेश वेळोवेळी काढण्यात आलेले आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा




