उपचारासाठी गेलेल्या महिलेची डॉक्टरने काढली छेड; संतप्त जमावाची डॉक्टरला मारहाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – शहर व परिसरात दिवसेंदिवस गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढतच आहे. रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका महिलेची छेड काढल्याप्रकरणी डॉक्टरला संतप्त जमावाने बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी जोगेश्वरीत घडली. या प्रकरणी आरोपी डॉक्टरविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी कि, वाळूज परिसरातील १९ वर्षीय विवाहित महिला कान दुखत असल्याने गुरुवारी (ता. २) दुपारी दीड वाजेच्या सुमारास सासू सोबत जोगेश्वरी येथील डॉ. नागेश शेजवळ यांच्या खासगी रुग्णालयात गेली होती. तेथे गेल्यानंतर डॉ. नागेश शेजवळ यांनी त्या महिलेची तपासणी करून औषधाची चिठ्ठी लिहून तिच्या सासूला मेडीकलमध्ये औषधी आणण्यासाठी पाठवले. महिलेची सासू मेडीकलमध्ये गेल्यानंतर डॉ. नागेश शेजवळ याने महिलेला इंजेक्शन देण्याचा बहाणा करत तिच्या मनाला लज्जा वाटेल, असे कृत्य केले. या प्रकारामुळे घाबरलेली महिला घरी निघून गेली. महिलेने या घटनेची वाच्यता कुठेही केली नाही. दरम्यान, शुक्रवारी (ता.३) रोजी दुपारी पीडित महिलेचा पती घरी आल्यानंतर पीडित महिलेने दवाखान्यात घडलेल्या प्रकाराची माहिती पतीला दिली. त्यामुळे तिच्या पतीने नातेवाईक व गावातील नागरिकांना माहिती दिल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान नातेवाईक व गावातील काहीजण दवाखान्यात डॉ. शेजवळ यांना जाब विचारण्यासाठी गेले. मात्र, या प्रकाराची कुणकूण लागताच डॉ. शेजवळ याने दवाखान्यातून पळ काढला.

त्याठिकाणी संतप्त जमावाने डॉ. शेजवळ याचा पाठलाग करून पकडून त्यांना बेदम मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत डॉ. नागेश शेजवळ यास ताब्यात घेतले. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून डॉ. नागेश शेजवळ याच्याविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अधाणे करीत आहे.

 

Leave a Comment