हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या ईडीच्या वतीने देशभरात ठिकठिकाणी छापे टाकले जात आहेत. ईडीच्या पथकाने नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांचीही चौकशी केली आहे. आता ईडीच्या पथकाने नॅशनल हेराल्डच्या दिल्ली व ठिकाणी कार्यालयावर छापा टाकला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात हे छापे टाकण्यात आले आहेत.
नॅशनल हेराल्ड केस प्रकरणात ईडीने टाकलेल्या छाप्यात 10 जनपथवर झालेल्या दस्तऐवजांचाही शोध घेतला जात आहे. या प्रकरणाशी संबंधित अनेक ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली आहे. सध्या अधिकाऱ्यांकडून छापेमारीत काही महत्वाची माहिती मिळतेय का ते पाहिले जात आहे.
#UPDATE | Enforcement Directorate (ED) is conducting raids at 12 locations in the National Herald case https://t.co/Y3jqAqRBfw
— ANI (@ANI) August 2, 2022
काय आहे नॅशनल हेराल्ड प्रकरण?
नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1938 साली हे वृत्तपत्र सुरु केले होते. हे वृत्तपत्र चालवण्याची जबाबदारी ‘असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड’ (एजेएल) नावाच्या कंपनीकडे होती. या कंपनीवर सुरुवातीपासून काँग्रेस आणि गांधी घराण्याचे वर्चस्व होते. तब्बल 70 वर्षांनंतर 2008 मध्ये हे वृत्तपत्र तोट्यात गेल्यामुळे बंद करावे लागले. त्यानंतर काँग्रेसने पक्ष निधीतून एजेएलला 90 कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले.
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी 2010 मध्ये ‘यंग इंडियन’ नावाची नवी कंपनी स्थापन केली. असोसिएटेड जर्नल्सला दिलेल्या कर्जाच्या बदल्यात यंग इंडियनला कंपनीत 99 टक्के हिस्सा मिळाला. सोनिया आणि राहुल गांधी यांची यंग इंडियन कंपनीत 38-38 टक्के हिस्सेदारी आहे. बाकीचा हिस्सा मोतीलाल बोरा आणि ऑस्कर फर्नांडिस यांच्याकडे होता. दरम्यान, याप्रकरणी ईडीनं यापूर्वी सोनिया गांधी यांचे पुत्र आणि खासदार राहुल गांधी यांचीही चौकशी केली होती.