सातारा | जावळी तालुक्याची अर्थवाहिनी असलेल्या दत्तात्रय कळंबे जावली सहकारी बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांनी या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. या बँकेची निवडणूक ता. 23 जुलैला होत आहे. जावली सहकारी बँकेच्या निवडणुकीत 17 संचालक निवडण्यात येणार आहेत.
या निवडणुकीसाठी ता. 20 जून ते 24 जूनदरम्यान 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करावयाची आहेत. ता. 27 जून रोजी अर्जांची छाननी होणार असून, ता. 28 जून ते 12 जुलैदरम्यान अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना ता. 13 जुलैला चिन्हवाटप होईल व अंतिम यादी प्रसिद्ध होईल. ता. 23 जुलैला मतदान होणार आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थानी दिली आहे.
जावली सहकारी बँकेच्या निवडणुकीत 17 जागा निवडण्यात येणार असून, त्यामध्ये सर्वसाधारण 12, महिला 2, अनुसूचित जाती जमाती 1, इतर मागास 1, भटक्या विमुक्त जाती जमाती, विशेष मागास प्रवर्ग 1 जागा अशी विभागणी करण्यात आली आहे.