विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) … भारतीय क्रिकेट संघाचे २ महारथी , २ दिग्गज खेळाडू आणि २ अनमोल रत्न…. दोघांचाही खेळ तोलामोलाचा, कोणीच कोणाच्या पुढे नाही आणि मागेही नाही… मोठे फटके मारणे, आपल्या टेक्निकच्या जोरावर मनात येईल तिथे बॉल मारण्यात रोहित पटाईत आहे तर दुसरीकडे आपल्या खेळात सातत्य ठेवण्यात आणि परिस्थिती जाण ओळखून संघासाठी जे काही उपयुक्त आहे ते करण्यात कोहली माहीर आहे. रोहितने २००७ चा T- २० वर्ल्डकप जिंकला होता, तर कोहलीने २०११ चा वर्ल्डकप जिंकला… मात्र दोघेही एकत्रित असं वर्ल्डकप जिंकले नव्हते. मात्र यंदाच्या T- २० वर्ल्डकप जिंकून त्यांनी प्रथमच हा आनंद एकत्रित साजरा केला आणि एकाच वेळी निवृत्ती जाहीर करत T- २० क्रिकेटला अलविदा केला. भारतीय क्रिकेटमध्ये एका युगाचा अंत झाला.
रोहित 2007 पासून आणि विराट 2010 पासून भारताच्या T20 संघाचा भाग आहे. दोघांनी या फॉरमॅटमध्ये अनेक मोठे विक्रम केले आणि आता टी-20 चॅम्पियन बनून त्यांच्या करिअरचा शेवट केला. कोहलीने 12 जून 2010 रोजी आपल्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. सुरुवातीपासूनच आपल्या कामगिरीत सातत्य राखणारा कोहली भारताचा नंबर १ चा बॅट्समन ठरला. रोहित, धोनी यांच्यासारखे मोठे फटके मारणं शक्य नसलं तरी आपल्या क्लासीक खेळीच्या जोरावर त्याने भारताला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिलेत. विराटने भारतासाठी 125 टी-20 सामने खेळले असून 48.69 च्या सरासरीने 4188 धावा केल्या आहेत. रोहित शर्मानंतर तो या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा कोहली दुसरा खेळाडू आहे. कोहलीने आपल्या कारकिर्दीत एक शतक आणि 38 अर्धशतके झळकावली. T20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक 1292 धावा करणारा तो फलंदाज आहे. त्याच्या नावावर टी-20 विश्वचषकात सर्वाधिक 15 अर्धशतकेही आहेत. यंदाच्या संपूर्ण T20 वर्ल्डकपमध्ये कोहलीची बॅट शांत होती. त्यामुळे कोहलीला संघातून काढून टाकण्याची मागणीही केली जात होती, त्यातच त्याचा स्ट्राईक रेट हा सध्याच्या आधुनिक क्रिकेटमध्ये जुळत नाही असा दावाही अनेक क्रिकेट विश्लेषक करू लागले. मात्र रोहितने शेवट्पर्यंत विराट कोहलीवर विश्वास ठेवला आणि कोहलीने सुद्धा फायनल मॅच मध्ये कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत मॅचविनिंग खेळी केली.
दुसरीकडे, रोहित शर्मा हा आक्रमक फलंदाज, एकदा जम बसला कि मग सुट्टी नाही… मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात चेंडू भिरकावण्याची रोहितची क्षमताच त्याला जगातील सर्वात्कृष्ट फलंदाज बनवते. रोहित शर्माने 2007 मध्ये टी-20 विश्वचषक ट्रॉफी जिंकून आपल्या T20 आंतरराष्ट्रीय करिअरची सुरुवात केली होती.आता तर १७ वर्षांनी त्याने स्वतः च्या नेतृत्वाखाली भारताला T20 विश्वचषक चॅम्पियन बनवले आणि चॅम्पियन म्हणूनच निवृत्ती जाहीर केली. रोहित शर्माने भारतासाठी 159 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 32.05 च्या सरासरीने आणि 140.89 च्या स्ट्राइक रेटने 4231 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये रोहीतच्या नावावर 5 शतके आणि 32 अर्धशतके आहेत. त्याची सर्वाधिक धावसंख्या नाबाद 121 आहे. आत्तापर्यंतच्या सर्वच T20 वर्ल्डकपमध्ये प्रतिनिधित्व केलेला रोहित शर्मा हा भारताचा एकमेव खेळाडू ठरला आहे. कर्णधार म्हणूनही रोहित शर्मा यशस्वीच ठरला. रोहितने टीम इंडियासाठी T20 मध्ये कर्णधार म्हणून 50 सामने जिंकले आहेत आणि हा देखील एक विक्रम आहे. आत्तापर्यंत कोणत्याही कर्णधाराने टी20 मध्ये त्याच्यापेक्षा जास्त सामने जिंकलेले नाहीत. आता विराट आणि रोहितने एकाच वेळी टी20 मधून निवृत्ती जाहीर केल्याने भारतीय क्रिकेटमधील एका युगाचा अंत झाला असं म्हणावं लागेल.