हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सध्या शेत शिवारात गवा रेड्यांकडून शेतकऱ्यांवर हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. अशीच एका शेतकऱ्यावर गवा रेड्याकडून हल्ला झाल्याची घटना आज सकाळी घडली असून हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. संबंधित शेतकऱ्यावर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिराळा तालुक्यातील मणदुर येथे वारणा डावा कालव्याच्या बाजुस असणाऱ्या काळांमा देवीच्या मंदीर परीसरात शुक्रवारी
सकाळी सातच्या सुमारास एका गव्याने अशोक विष्णु सोनार (वय 62) या शेतकऱ्यावर गंभीर हल्ला केला. यावेळी शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यांनी आरडाओरडा केल्याने गवा डोंगराच्या दिशेने पळुन गेला. या हल्ल्यात संबंधित शेतकरी हा गंभीर जखमी झाला. याची माहिती मणदुर गावात समजताच इतर ग्रामस्थ, शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली.
दरम्यान, वनविभागाचे वनपाल गार्दी यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली तसेच जखमी शेतकऱ्यास प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर त्यास पुढील उपचारासाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
सदर गव्यांचा कळप वारणावती वसाहती जवळ असणाऱ्या पाणी पुरवठा टाकी जवळ रात्री हे गवे ग्रामस्थांना दिसले होते. दिवसा उन्हाची तिव्रता वाढत असल्याने सध्या शेतकरी वर्ग सकाळी लवकर खरीप हंगामतील मशागतीची कामे आपल्या
शेतात करण्यास लवकर जात आहेत असे जर हल्ले सातत्याने घडु लागले तर शेतकऱ्यांनी शेतात काम करण्यास जायाचे कसे? असा सवाल मणदुर ग्रामस्थ करत आहेत.