हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकरी राजा संपूर्ण जगाचा पोशिंदा असल्यामुळे त्याच्या सर्व समस्यांवर तोडगा काढण्याचे काम प्रशासनाचे असते. सरकारकडून शेतकऱ्यांसाठी कित्येक शासकीय योजना राबविल्या जातात. मात्र सरकार शेतकऱ्यांच्या पायाभूत सुविधांकडे लक्ष देताना दिसत नाही. त्यामुळे एका शेतकरी महिलेने सरकारकडे लक्षवेधी मागणी केली आहे. शेतात जाण्यासाठी रस्ता नाही, त्यामुळे आम्हाला एक हेलिकॉप्टर उपलब्ध करून द्या अशी मागणी महिलेने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. लताबाई भास्कर हिंगे असे या शेतकरी महिलेचे नाव असून त्या शिरूर तालुक्यात राहतात.
या संदर्भात त्यांनी तहसील कार्यालयात अर्ज देखील दाखल केला होता. त्यांच्या या अर्जाची दखल घेऊन संबंधित मंडळ अधिकारी यांना स्थळ पाहणी करण्याचे आदेश दिले होते. परंतु मंडळाधिकाऱ्यांकडून याबाबत कोणताही पाठपुरावा करण्यात आला नाही. यावेळी शेतकरी लताबाई यांनी सतत कार्यालयात जाऊन लवकरात लवकर पाठपुरावा करण्यात यावा अशी विनंती केली मात्र या विनंतीकडे देखील प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले.
त्यामुळे आता नाईलाजाने त्यांनी शेतात जाण्यासाठी वैयक्तिक पैशातून एक हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे हेलिकॉप्टर खरेदी करण्यासाठी त्यांनी शिरूर तहसिदार यांचेकडे शासकीय अनुदान किंवा आर्थिक मदत मिळावी यासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर काही काळातच प्रशासनाकडून निर्णय देण्यात येईल. मात्र लताबाई यांनी केलेल्या मागणीचा आता सर्वत्र बोभाटा झाला आहे.
लताबाई हिंगे यांच्या शेतातील पीक काढणीला आले आहे. मात्र शेतात जाण्यासाठी कोणताच रुंद रस्ता नसल्यामुळे शेतमाल बाहेर कसा काढायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित राहिला आहे. यावर काही ना काही तोडगा काढण्यासाठी त्यांनी हेलिकॉप्टर घेऊन देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. त्यांच्या या मागणीने आता सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.