हर्सूल कारागृहात कैद्यांसाठी होणार मराठवाड्यातील पहिले रेडिओ केंद्र

औरंगाबाद – शहरातील हर्सूलच्या मध्यवर्ती कारागृहात नव्याने मराठवाड्यातील पहिले रेडिओ केंद्र सुरू करण्यात येणार आहे. याच्या चाचण्या पूर्ण झाल्या असून 1 हजार 200 कैद्यी असणाऱ्या कारागृहातील चांगली वर्तणूक असणाऱ्या कलाकार कैद्यांमार्फत रेडिओचे काम पूर्ण करण्यात आले असून तीन विभागातील 48 बराकीमध्ये आता ध्वनिसंर्वधक बसविण्यात आले असून आता ‘कैदी आपकी फर्माईश’ सारखे कार्यक्रम पोहोचवतील.

यातील कोणत्या कार्यक्रमाचे प्रसारण करायचे व कोणत्या नाही, हे वरिष्ठ अधिकारी तपासतील त्यानंतरच त्याचे प्रसारण केले जाणार आहे.
हर्सूल येथे कारागृहात कैद्यांची संख्या तशी नेहमीच अधिक असते. त्यात गुन्हा केल्यानंतरही चांगली वर्तणूक असणारे अनेक कैदी आहेत. त्यांना योग्य वातावरण मिळावे म्हणून गाण्यांसह प्रबोधनाचे कार्यक्रमही रेडिओवरून प्रसारित केले जाणार आहेत. सुरुवातीच्या काही दिवसात हा कालावधी एक तासाभराचा असावा असे प्रयत्न आहेत. दर्जा चांगला राहिला तर आणखी एखाद्या तासाची त्यात भर टाकली जाईल असे कारागृहाचे अधीक्षक अरुणा मुकुटराव यांनी सांगितले. कैद्यांमध्ये असणाऱ्या

कलागुणांना या उपक्रमातून वाव मिळेल असा दावाही केला जात आहे. दुपारी 12 वाजता कारागृहात कार्यक्रम प्रसाराची वेळ ठरविण्यात आली आहे. कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची या उपक्रमास परवानगी घेण्यात आली असल्याचेही अधीक्षक मुकुटराव यांनी सांगितले.