औरंगाबाद – ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने जगभरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्या धर्तीवर महाराष्ट्रातही मुख्यमंत्र्यांनी खबरदारीच्या उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे औरंगाबाद महापालिकेअंतर्गत येणाऱ्या शहरातील पहिली ते चौथीच्या शाळा आता 1 डिसेंबरऐवजी 10 डिसेंबर रोजी सुरु होतील, असे महापालिकेच्या वतीने कळवण्यात आले आहे. यामुळे पुन्हा एकदा मुलांना शाळा सुरु होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
औरंगाबाद महापालिकेचे उपायुक्त संतोष टेंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून शहरातील पहिली ते चौथीच्या शाळा येत्या 10 डिसेंबरपर्यंत बंदच राहतील. 10 तारखेनंतर शहरातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर शाळा सुरु करायच्या की नाही, याबाबत निर्णय घेतला जाईल.
मात्र शहरातील पाचवी ते दहावीच्या शाळा सुरु असून अद्याप त्या पुढे किती दिवस सुरु ठेवायच्या, यावर निर्णय झालेला नाही.