कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
पुणे- बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हापूर नाका येथील कराड शहराजवळील 19 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला उड्डाणपूल रविवारी रात्रीच्या सुमारास पाडण्यात आला. तत्पूर्वी पूल परिसरातील महामार्गावरील वाहतूक काहीकाळ थांबवण्यात आली होती. पूल पाडण्यासाठी 8 अत्याधुनिक मशिन, पोकलॅन, डंपर यासह अन्य वाहनांचा उपयोग केला जात आहे.
कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपूल पाडण्याच्या कामास ८ फेब्रुवारीपासून सुरुवात करण्यात आली. कराड शहराचे प्रवेशद्वार असलेल्या कोल्हापूर नाका येथील 2003 साली संबंधित उड्डाणपूल बांधण्यात आला होता. शनिवारी मध्यरात्री म्हणजेच रविवारी दि. 5 रोजी 12 नंतर सदरील उड्डाणपूलावरील वाहतूक बंद करण्याबाबत जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख यांनी अधिसूचना जारी केली होती. त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून वाहतूक सुरू असल्याने नक्की पूल कधी पाडणार याबाबत चर्चांना उधाण आले होते. मात्र, काल रात्री संबंधित पूल पाडण्याच्याच कामास अधिक गती घेण्यात आली.
कराडच्या 19 वर्षांपूर्वीच्या मोठ्या उड्डाणपूलावर पडला हातोडा
रात्रीत पाडला उडाणपुलाचा मध्यभाग : 8 अत्याधुनिक मशिनरींचा वापर pic.twitter.com/qt1Q1EknHZ
— santosh gurav (@santosh29590931) February 13, 2023
मागील आठवड्यात रविवारपासून दोन्ही उड्डाण पूल पाडण्यास परवानगी देण्यात आल्यानंतर बुधवारी रात्रीपासून कोल्हापूर नाक्यावरील उड्डाण पूल पाडण्यास प्रारंभ करण्यात आला. त्यासाठी 8 अत्याधुनिक मशिन, पोकलॅन, डंपर यासह अन्य वाहनांचा उपयोग केला जात आहे. हा उड्डाण पूल पाडण्यासाठी जवळपास महिन्याचा अवधी लागणार आहे.
त्यामुळेच कोयना पुलावरून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक सेवा रस्त्यावरून वळवण्यात आली आहे. त्याचबरोबर कराड शहरात प्रवेश करण्यासाठी कोल्हापूर बाजूकडून येणाऱ्या वाहनांना वारूंजी फाट्यावरून कराडमध्ये यावे लागत आहे. त्यामुळेच जुन्या कोयना पुलावर वाहतुकीचा मोठा ताण निर्माण झाला आहे.
60 कर्मचारी आणि 13 सीसीटीव्हीद्वारे कामावर ‘वॉच’
कोल्हापूर नाक्यावरील पुलाचे काम सुरु असताना होणारी वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वारूंजी फाट्यापासून मलकापूरमधील डी मार्टपर्यंत वाहतूक पोलिसांसोबत संबंधित ठेकेदार कंपनीकडून 60 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी 13 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. कंट्रोल रूममधून वाहतूक नियंत्रणासाठी तैनात असणारे पोलिस व अन्य कर्मचारी यांना सूचना दिल्या जाणार आहेत.