वाई | वाई वनपरिक्षेत्रातील वनपरिमंडळ वाई लगडवाडी (ता. वाई) येथील राखीव वनक्षेत्रात वणवा लागल्याप्रकरणी भरत सदाशिव महानवर व मेहुल तानाजी महानवर ( रा. लगडवाडी, ता. वाई) यांच्यावर कारवाई करून ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, भरत महानवर व मेहुल महानवर यांनी स्वत:च्या मालकीच्या शेताच्या बांधावर (दि. २० एप्रिल) आग लावली. मात्र ती आटोक्यात न आल्याने आग भडकली व राखीव वनक्षेत्रात पसरली व दहा हेक्टर राखीव वनक्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पाडले.
आगीची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक युवकांच्या मदतीने आग आटोक्यात आणली. तपास केला असता आग ही भरत महानवर व मेहुल महानवर यांनीच लावल्याचे निदर्शनास आले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी आरोपींना पकडण्यासाठी लगडवाडी सरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी सहकार्य केले.
वाईचे वनक्षेत्रपाल महेश झाजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली भुईंजचे वनपाल संग्राम मोरे, बोपेगाव वनरक्षक लक्ष्मण देशमुख, संजय आडे, वनमजूर लालसिंग पवार, अमोल इथापे, चालक श्रीनाथ गुळवे यांनी या कारवाईत भाग घेतला.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा