पोलिसांच्या रेकॉर्डवरील चौघांना सातारा जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

Deportation
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड उपविभागात पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेल्या चौघांना जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. उपविभागीय दंडाधिकार्‍यांनी याबाबतचा आदेश दिला असून अन्य काहीजण पोलिसांच्या रडारवर आहेत. शेखर ऊर्फ बाळू प्रकाश सुर्यवंशी (रा. हजारमाची-ओगलेवाडी, ता. कराड), अमित हणमंत कदम (रा. होली फॅमिली स्कुलमागे, वैभव कॉलनी, विद्यानगर-सैदापूर), तुकाराम ऊर्फ बाबा पंडीत जगताप (रा. कोडोली, ता. कराड) व अनिकेत रमेश बाबर (रा. उंब्रज, ता. कराड) अशी हद्दपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलीस उपअधिक्षक डॉ. रणजीत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपविभागात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांमार्फत कसोशिने प्रयत्न केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून रेकॉर्डवरील आरोपींवर वारंवार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येते. तसेच त्यांना त्यांच्या वर्तनात सुधारणा करण्यासाठी संधीही दिली जाते. मात्र, काहीजण संधी देऊनही वारंवार गुन्हे करतात. त्यामुळे त्यांना हद्दपार करण्याबाबतचे प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकार्‍यांकडे पाठविले जातात.

कराड शहर, ग्रामीण व उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौघांविरूद्धचे असे प्रस्ताव 2019-2020 मध्ये दंडाधिकार्‍यांकडे पाठविण्यात आले होते. तत्कालिन पोलीस उपअधिक्षकांनी त्याबाबत परिपुर्ण चौकशी करून उपविभागीय दंडाधिकार्‍यांना अहवालही सादर केला होता. त्यानुसार संबंधित चौघांना एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

दरम्यान, उपविभागात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित ठेवण्याचे उद्दीष्ट ठेऊन यापुढेही गुन्हेगारी कारवाया करून सामाजिक स्वास्थ्य बिघडविणार्‍यांवर हद्दपारीची कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलीस उपअधिक्षक डॉ. रणजीत पाटील यांनी दिला आहे.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group