औरंगाबाद : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंत्रणांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. घाटी रुग्णालयात रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने घाटीला आवश्यक मनुष्यबळ, साहित्य तसेच इतर सर्व सोयी-सुविधा पुरविण्यास प्राधान्य देण्यात येणार असून, रुग्णसेवेसाठी घाटीला निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.
कोरोनाचा वाढता प्रसार पाहता पुढील नियोजन करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास भेट दिली. यावेळी त्यांच्या अध्यक्षतेखाली घाटीतील नवीन ग्रंथालयाच्या दालनात आढावा बैठक पार पडली. यावेळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, प्रभारी अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे, उपअधिष्ठाता डॉ. के.यू. झिने, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे, औषधशास्त्र विभागाच्या विभाप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. ज्योती इरावणे तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
बैठकीमध्ये प्रभारी अधिष्ठाता डॉ. रोटे यांनी सद्य:स्थितीमध्ये कोविड-19 रुग्णकक्षेतील व करीत असलेल्या इतर उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती जिल्हाधिका-यांना दिली. यावेळी डॉ. रोटे यांनी कोविड वाॅर्डामध्ये 1 पोर्टेबल एक्स रे मशीनची तात्काळ आवश्यकता असून पुढील 3 महिन्यांसाठी लागणा-या औषधी व सर्जिकल साहित्यासाठी निधीची मागणी केली. तसेच सद्य:स्थितीत दररोज मोठ्या प्रमाणात कोविड रुग्ण उपचारासाठी येत असून अपुऱ्या मनुष्यबळाअभावी रुग्णसेवेत अडचणी येत असल्याने मनुष्यबळ देण्यात यावे. तसेच रुग्णांकरिता व्हेंटिलेटर आवश्यक असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी-यांनी तात्काळ आवश्यक तेवढ्या पोर्टेबल एक्स रे मशीन पुरविण्यात येतील, घाटीला आवश्यक तेवढा निधी आणि मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात येईल असे सांगत इतर काही रुग्णसेवेबाबत अडचणी असल्यास उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य यांच्याशी समन्वय ठेवावा, असे सांगत जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात ज्या ठिकाणी विनावापर व्हेंटिलेटर पडून आहेत, ते घाटीला देण्यात यावेत, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांस निर्देशित केले.
डॉ. मिनाक्षी भट्टाचार्य यांनी कोविड रुग्ण एका कक्षेतून दुसऱ्या कक्षेत स्थलांतरित करण्यासाठी 2 रुग्णवाहिका व 2 वाहन चालक उपलब्ध करुन देण्याची जिल्हाधिकारी यांना विनंती केली असता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य यांना 2 रुग्णवाहिका आणि 2 वाहन चालक उपलब्ध करुन देण्याबाबत सुचित केले. तसेच कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी ज्या काही गोष्टींची आवश्यकता असेल त्याबाबतचा प्रस्ताव तयार करुन माझ्याकडे पाठवावा त्यास तात्काळ मंजुरी देण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा