थांब आता तुला जिवंतच सोडत नाही म्हणत त्यांनी वकिलावर रोखले पिस्तूल

Lawyer Pistol News
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेत जमिनीच्या वादावरून भावा-भावात वाद झालेले सर्वांनी पाहिले असतील. मात्र, पाणंद रस्त्याच्या वादावरून एका वकिलावरच थेट पिस्तूल रोखण्यात आल्याची घटना सातारा जिल्ह्यात घडली. आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ‘आता थांब तुला जिवंत सोडत नाही,’ अशी धमकी देत पिस्तूल रोखणाऱ्या पाच जणांविरोधात सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

संपत सदाशिव इंदलकर, संपत इंदलकर यांची पत्नी, राजेंद्र परशुराम लावंघरे, अनंत परशुराम लावंघरे, सिद्धेश संपत इंदलकर (सर्व रा. कळंबे, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विजय विष्णू इंदलकर (वय 42, रा. कळंबे, ता. सातारा) हे व्यवसायाने वकील आहेत. शनिवार, दि. 15 रोजी सकाळी राजेंद्र लावंघरे यांनी विजय इंदलकर यांना फोन केला. यावेळी राजेंद्र यांनी ‘मी पाणंद रस्ता जेसीबीने खोदून बंद करणार आहे. तू जर इथे आलास तर तुझा मुडदा पाडणार,’ अशी धमकी दिली.

या प्रकारानंतर वकील विजय इंदलकर हे पाणंद रस्त्याजवळ गेले. त्यावेळी त्यांनी पाणंद रस्ता खोदत असल्याचे पाहिले. त्यावेळी विजय इंदलकर हे जेसीबीसमोर जाऊन रस्त्यावर आडवे झाले. यावेळी राजेंद्र यांच्यासह संशयितांनी त्यांना दमदाटी करून धक्काबुक्की केली. तर सिद्धेश इंदलकरने काळ्या रंगाचे पिस्तूल विजय यांच्यावर रोखले. ‘मी तुला जिवंत सोडत नाही, अशी दमदाटी केली. यावेळी गावकऱ्यांनी वाद सोडवण्यात प्रयत्न केला असता त्यांनाही देखील शिवीगाळ व दमदाटी केली. या प्रकारानंतर अॅड. विजय इंदलकर यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात रात्री उशिरा धमकवणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला. सहायक फाैजदार देशमाने हे अधिक तपास करीत आहेत.