औरंगाबाद | गेल्या कित्येक वर्षांपासून औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करण्यावरून राजकीय वाद आहेत. काल स्वातंत्र्य दिनी पुन्हा एकदा औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्याबाबत शिवसेना गंभीर असून हीच ती अनुकूल वेळ असल्याचे पालकमंत्री तथा उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. तर दुसरीकडे तुमच्यात हिंमत असेल तर नाव बदलून दाखवा असे खुले आव्हान खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेनेला केले आहे.
औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची हीच ती वेळ आहे. याबाबत बोलताना सुभाष देसाई यांनी म्हटलं की, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी या शहराचं नाव संभाजीनगर केले होतं. त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री आहेत. शिवाय त्यांना पाठिंबा देणारे दोन पक्ष सोबत आहेत. मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीचे सर्व नेते याबाबत लवकरच निर्णय घेतील. काही तांत्रिक गोष्टी आहेत मात्र यावरही तोडगा निघेल, असं सुभाष देसाई म्हणाले. यापूर्वी विभागीय आयुक्तांना तसा प्रस्तावही पाठवलेला आहे. त्यामुळे आता हीच ती वेळ आहे, औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याची. याबाबत राज्य सरकार लवकरच निर्णय घेईल असंही पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.
तर दुसरीकडे तुमच्यात हिंमत असेल तर नाव बदलून दाखवा असे खुले आव्हान खासदार जलील यांनी शिवसेनेला केले आहे. या शहराचा खूप विकास करा. त्याला फाईव्ह स्टार कॅटेगिरित आणा, पण इथं लोकांना प्यायला पाणी नाही आणि नाव कसं बदलता ? असा बोचरा सवाल देखील खासदार इम्तियाज जलील यांनी केला. तसेच नामांतरासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी यांची तयारी नाही, त्यामुळे आधी त्यांना बोला मग आम्हाला सांगा, असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे. आम्ही जनतेसाठी महत्वाचे ठरणारे क्रीडा विद्यापीठ पुणेला का नेलं ? हा सवाल करत असताना केवळ मुद्दा भरकटवण्यासाठी असे वक्तव्य केले जात असल्याचा आरोप जलील यांनी केला.
एकंदरीतच निवडणुकीच्या तोंडावर नेहमीप्रमाणे या वर्षी सुद्धा शहराच्या नामांतरावरुन राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच निवडणुकीत देखील हाच मुद्दा अनेक पक्षांकडून हत्यार म्हणून वापरले जाणार असल्याचे दिसत आहे.