औरंगाबाद – शहरातील उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या प्रा. राजन शिंदे यांचा खून चोरीच्या उद्देशाने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज लावण्यात आला होता. परंतु, घरातून एकही वस्तू चोरीला गेली नाही आणि कुटुंबातील इतर सदस्यांनाही धक्का लागला नाही. या परिस्थितीवरून पोलिसांना एक वेगळाच अँगल मिळाला. यानंतर पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. प्रा. राजन शिंदे यांचे शहरात मोठे नाव होते. प्राध्यापक वर्गात तसेच सामाजिक वर्गातही त्यांची मोठ्या प्रमाणावर ओळख होती, म्हणून स्वतः पोलीस आयुक्त डॉक्टर निखील गुप्ता यांनी या प्रकरणाचा तपास आपल्या हाती घेतला.
या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना सुरुवातीला ठोस पुरावे मिळत नव्हते. घरात कुठेही घरच्या व्यतिरिक्त मारेकऱ्यांच्या हाताचे किंवा पावलांचे ठसे देखील नव्हते. झटापट झाल्याच्या खुणा नव्हत्या. तसेच राजन शिंदे यांच्या पत्नी मनीषा शिंदे व इतर सदस्यांनाही काहीच कळाले नाही किंवा आवाज आला नाही. या सर्व गोष्टींमुळे पोलिसांचा कुटुंबीयांवर संशय बळावला यानंतर मोठ्या चौकशीअंती अल्पवयीन मुलाने खुनाची कबुली दिली आणि हत्यार घराजवळील विहिरीत टाकल्याचे सांगितले.
दिवस-रात्र एक करून पोलिसांनी सर्व तपासानंतर 18 ऑक्टोबरला घटनेचा उलगडा केला. विहिरीतील पाणी उपसून डंबेल्स चाकू आणि रक्ताने माखलेला टॉवेल जप्त करण्यात आला. पण अद्यापही घटनेचा संपूर्ण उलगडा झालेलाच नाही. या घटनेचा उलगडा झाला असा दावा पोलिस करत असले, तरी आजही अनेक प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहेत. प्रा. राजन शिंदे यांच्यावर हल्ला होताना त्यांच्या पत्नी, मुलगी, आई वडिलांना काहीच कसे कळाले नाही ? त्यांना कुठलाच आवाज किंवा झटापटी चा आवाज आला नाही का ? प्रकरण कळालं तरी ते शांत कसे आहेत ? त्यांनी आरोपीला अडवले का नाही ? शिंदे यांची घरात वागणूक कशी होती ? यासह अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांची उत्तरे अजूनही पोलिसांना मिळालेली नाहीत. हे प्रकरण वाटते तितके सरळ आणि सोपे देखिल नाही. कारण आरोपीने खुनाची कबुली दिली असली तरी गुन्ह्यात त्याचा एकट्याचा सहभाग होता की, अजून कोणी त्याला मदत केली याचा शोध मात्र अजून लागण्याचा बाकी आहे.