कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील कोळे येथे एक बिबट्याचे पिल्लू मंगळवारी विहिरीत पडले होते. त्या पिल्लाला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जीवदान दिल्याची घटना बुधवारी घडली. विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याच्या पिल्लाची सुखरूप सुटकाही केली.
याबाबत अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील कोळे येथील जयवंत बाबुराव माळी यांच्या मालकीच्या विहिरीत मंगळवारी रात्रीच्या वेळी वन्य प्राणी बिबट्याचे पिल्लू पडले होते. विहिरीत पिल्लू पडल्याचे निदर्शनास आल्यानंतर या घटनेची माहिती माळी यांनी तात्काळ वनविभागाला दिली. त्यानंतर या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळावर दाखल झाले आणि त्यांनी त्या बिबट्याच्या पिलास दोर व जाळीच्या सहाय्याने स्थानिकांच्या मदतीने सुरक्षितपणे बाहेर काढले.
सातारा उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुरणे यांच्या मार्गदर्शनाखाली कराड वनक्षेत्रपाल तुषार नवले, डॉ. सावने, कोळे वन परिमंडळ अधिकारी बाबुराव कदम, कोळे वनरक्षक भारत खटावकर, वनरक्षक ओगलेवाडी उत्तम पांढरे, वनरक्षक चोरे अरविंद जाधव, वनमजूर मयुर जाधव, योगेश बडेकर, अरुण शिंदे, अमोल कांबळे यांनी या बिबट्याच्या पिल्लाला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी परिश्रम घेतले. त्यासाठी त्यांना कोळे ग्रामपंचायतीचे सरपंच पोलीस पाटील तसेच स्थानिक ग्रामस्थांचे अनमोल सहकार्य लाभले.