व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

बिबट्याची आता इस्लामपुर मध्ये ‘एन्ट्री’, शहरातील उपनगरांमध्ये दहशतीचे वातावरण

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

वाळवा तालुक्यातील डोंगर परिसरात निदर्शनास येणारा बिबट्या सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास इस्लामपूर शहरातील जिजाईनगर परिसरात दाखल झाल्याने शहरात दहशतीचे वातावरण आहे. शहराच्या उपनगरातील वस्तीवरील नागरिकांनी रात्रीच्या वेळी दक्षता घेेण्याच्या सूचना वन विभागामार्फत देण्यात आल्या आहेत. इस्लामपूर शहराच्या जिजाऊनगर येथे अभिनंदन पाटील कुुटुंबीयांसह भाड्याच्या घरात वास्तव्यास असून शेजारीच त्यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. सोमवारी पहाटे 2.30 च्या सुमारास परिसरातील कुत्र्यांनी दंगा सुरू केला. त्यांनी बांधकामासाठी सळी आणली होती.

लोखंडी वस्तू चोरीला जाण्याचे प्रकार होत असल्याने त्यांनी बाहेर पाहिले तर कोणीच नव्हते. कुत्री मात्र बांधकाम सुरू असणार्‍या इमारतीच्या दिशेने भुंकत होते. दरम्यान नव्याने बांधकाम सुरू असणार्‍या इमारतीच्या बांधकामावर एक प्राणी बसलेला आढळून आला. त्या प्राण्याची मोठी शेपटी पाहिल्याने त्यांना बिबट्या असल्याचे दिसले. अभिनंदन पाटील यांनी बिबट्याच असल्याची खात्री करण्यासाठी लाईट लावली. लाईट सुरू होताच बिबट्याने बांधकामावरून उडी मारून शेताच्या दिशेने पलायन केले.

सकाळी पाहणी केली असता इमारतीच्या बांधकामावर बिबट्याचे केस आणि पायाने ओरखडलेले तर बांधकामाशेजारी पायाचे ठसे आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच वनरक्षक अमोल साठे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. परिसरातील पायाच्या ठश्यावरून बिबट्याचे ठसे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी परिसरातील नागरिकांची भेट घेत वस्तीवरील नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन केले.