कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड नगरपालिकेने थकीत कराच्या वसुलीसाठी 31 मार्च ही तारीख दिली होती. त्यानंतर एप्रिल महिन्यात थकबाकीदारांवर कारवाईचा इशारा दिला होता. तरीही अनेक थकबाकीदार असल्याने आता कराड नगपालिकेने गुरूवार दि. 5 मे पासून थकबाकीदारांची नावे फ्लेस बोर्डवर लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे थकबाकीदारांचा जाहीर पंचनामा शहरात झळकणार आहे.
शहरातील अनेक नागरिकांनी मार्च महिना संपून आता एप्रिल महिनाही संपला आहे. तरी अनेक थकबाकीदारांनी कर भरलेला नसल्याने शहरात थकबाकीदारांचे नांवे फ्लेक्स बोर्डवर लावण्याचा निर्णय नगरपालिकेच्यावतीने घेण्यात आला आहे. तसेच थकित मिळकतधारकांनी दि. 1 मे पूर्वी कराची व पाणीपट्टीची रक्कम भरण्याचे आवाहन नगरपालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
मार्च महिनाअखेर नगरपालिकेस वसुलीचे उद्दिष्ट सुमारे 70 टक्के गाठण्यात यश आले आहे. तरीही उर्वरित थकीत वसुली करण्याचे आवाहन पालिकेपुढे आहे. गेली दोन वर्षे कोरोना महामारीत गेल्याने नागरिकांना आर्थिक अडचणी आहेत. त्यामुळे पालिकेच्या वसुलीवर परिणाम झाला अहे. तरीही नगरपालिकेने थकबाकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. वसुलीचा टक्का वाढवण्यासाठी नगरपालिकेने आता कडक निर्णय घेण्याची भूमिका घेऊन थकबाकीदारांची नावे फ्लेसवर लावण्याचा निर्णय घेतला आहे.
नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी थकीत वसुलीसाठी संबंधितांना नोटीसही दिली आहे. शहरात या नोटीसचे फलकही लागले आहेत. या नोटीसीमध्ये पालिकेने थकीत मिळकतधारकांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. त्यामध्ये 1 मे पर्यंत थकीत घरपट्टी व पाणीपट्टी नगरपालिकेकडे जमा करुन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा 5 मे पासून शहरात थकीत मिळकतधारकांची नावे फ्लेक्स बोर्डवर झळकणार असल्याचेही त्यात म्हटले आहे. या निर्णयामुळे कराड नगरपालिकेच्या थकीत खातेदार नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. परंतु नगरपालिकेने घेतलेला हा धाडसी निर्णय आमलांत आणणार की पुन्हा पोकळ ठरणार हे 5 मे रोजी कळेल.