औरंगाबादचे आगामी खासदार चंद्रकांत खैरेच असणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – औरंगाबादचे आगामी खासदार म्हणून शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरेच असणार असून यापुढील जिल्ह्यात सर्वच निवडणुका माजी खासदार खैरे यांच्याच नेतृत्वाखाली लढविल्या जातील. जिल्ह्याचे पक्षांच्या धोरणे आणि ध्येयचे निर्णयही तेच घेतील, अशी थेट घोषणा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाच्या निवडी दरम्यान केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांमध्ये खळबळ उडाली असल्याच्या चर्चेला वेग घेतला आहे. सोयगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जिल्ह्यातील शिवसेनेचे राजकारण ढवळून निघाल्याचे मंगळवारी पाहावयास मिळाले असून जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीचा सत्तार गटाच्या उमेदवाराचा परभव चांगलाच जिव्हारी लागल्याचे या दरम्यान आढळून आले आहे.

मंगळवारी सोयगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे हे सोयगावात आले होते. निवडीच्या घोषणेनंतर राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची थेट पेढेतुला करून जिल्ह्याचा आगामी खासदार चंद्रकांत खैरेच असतील अशी थेट घोषणा करून टाकली. आणि यापुढील निवडणुकांमध्ये पक्षाच्या बाबतीत सर्वच निर्णय माजी खासदार खैरे हे घेवून त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढविण्यात येतील असेही उद्गार सत्तार यांनी काढल्याने शिवसेनेत नवीन बदल होतो कि काय अशी राजकीय चर्चा जिल्हाभर सुरु झालेली आहे.

औरंगाबाद जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीत झालेल्या सत्तार-भुमरे यांच्या वादाचे हे पडसाद असल्याच्या चर्चेलाही वेग आला होता. या घोषणे सोबतच सत्ता स्थापनेच्या पहिल्याच दिवशी सोयगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. लवकरच सोयगावात छत्रपतींचा पुतळा उभारण्यात येईल. सोबतच सोयगावला स्वच्छ पाणी तसेच पायाभूत सुविधा व सोयगावच्या सर्वांगीण विकास साधण्यात नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व नगरसेवक कमी पडणार नाही, असा विश्वास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी व्यक्त केला.