औरंगाबाद | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने राज्यातील सलून दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयास महाराष्ट्र नाभिक महामंडळाने तीव्र विरोध दर्शवून राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. आंदोलनाचा एक भाग म्हणून शनिवारी शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. लोकशाही मार्गाने, जमावबंदी आदेशाचे पालन करून जिल्ह्यात विविध ठिकाणी समाजबांधवांनी आंदोलन केल्याची माहिती नाभिक महामंडळाचे विभागीय अध्यक्ष विष्णू वखरे यांनी दिली.
वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सलून दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला. नाभिक समाजाने आक्रमक भूमिका घेऊन शासनाच्या निर्णयाचा निषेध नोंदवला. शासन निर्णयाची होळी केल्यानंतर राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्याअंतर्गत शनिवारी समाज बांधवानी सलून दुकान, स्वतःच्या घरासमोर शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. प्रतिकात्मक पुतळ्यावर दुकान चालू करण्यासंदर्भातील मागण्याबरोबरच समाजाला आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली. जिल्ह्यातील समाजबांधवानी लोकशाही मार्गाने, जमावबंदी आदेशाचे पालन करून हे आंदोलन पार पाडले. लहान मुलासह, सलून मालक, कारागीर या आंदोलनात सहभागी झाले होते.
मागील वर्षीच्या लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्यातील १६ सलून व्यावसायिकांनी आत्महत्या केली. यावर्षीही सलून व्यावसायिकांवर भयावह परिस्थिती आहे. इतर व्यावसायिकांप्रमाणे सलून दुकाने सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत उघडण्यास परवानगी द्यावी, अशी नाभिक महामंडळाची मागणी आहे. शासनाने सकारात्मक विचार न केल्यास आता १४ एप्रिलला थाळी-घंटानाद आंदोलन, १८ एप्रिलला दुकानासमोर शासनाचा निषेध व्यक्त करणारे फलक हाती घेऊन आंदोलन तर २२ एप्रिलला मुंडन आंदोलन करून शासनाने घेतलेल्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला जाणार असल्याचे विष्णू वखरे यांनी सांगितले.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Grou




