औरंगाबाद – शहरांच्या वाढीव लोकसंख्येनुसार महापालिकेतील नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा निर्णय राज्य शासनाने नुकताच घेतला. यासंबंधी अध्यादेशावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सही केल्यामुळे नगरसेवकांच्या संख्यावाढीवर शिक्कमोर्तब झाले आहे.
राज्य शासनाने २७ ऑक्टोबर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई वगळता राज्यातील सर्व महापालिकांच्या नगरसेवकांच्या संख्येत १७ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला. १२ ते १४ लाख लोकसंख्या असलेल्या शहरांसाठी १२६ नगरसेवकांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे औरंगाबादेत आता १२६ नगरसेवक निवडून येतील. सध्या ११५ नगरसेवक असल्याने त्यात आता ११ नगरसेवकांची भर पडणार आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या वॉर्डांच्या सीमारेषा आणि वॉर्डांची नावे देखील बदलणार आहेत. वॉर्डांचे क्षेत्रफळ कमी होईल, त्यामुळे वॉर्ड आकाराने लहान होतील. वॉर्डांमधील लोकसंख्या व मतदारांची संख्या देखील तुलनेने कमी असेल अशी, शक्यता व्यक्त केली जात आहे.
तीन वॉर्डांचा एक प्रभाग या नुसार महापालिकेची निवडणूक होणार आहे. १२६ नगरसेवकांचा विचार करता एका प्रभागाची लोकसंख्या २९ हजार २३८ असेल. त्यात दहा टक्के वाढीची आणि दहा टक्के कपातीची देखील तरतूद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे एक प्रभाग ३२ हजार १६१ लोकसंख्येचा असेल तर दहा टक्के कपातीचा विचार केल्यास एक प्रभाग २६ हजार ३१५ लोकसंख्येचा असणार आहे. नव्याने वाढणारे अकरा वॉर्ड शहराच्या विस्तारित भागातच वाढतील अशी शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळाने नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला असला तरी महापालिका यासंदर्भातील आदेशाची वाट पाहत आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी अध्यादेशावर सही केली आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या संख्येत वाढीवर शिक्कामोर्तब झाले आहे.