औरंगाबाद – जिल्ह्यातील रस्त्यांवर मागील काही दिवसांपासून एसटी महामंडळाच्या साध्या म्हणजेच लाल्परी धावण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठ्याप्रमाणावर दिलासा मिळाला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काल दिवसभरात 21 शिवशाही, 51 साध्या (लाल) आणि 6 हिरकणी बस धावल्या. जिल्ह्यात 13 डिसेंबर रोजी 22 साध्या बसेस धावल्या होत्या. साध्या बसेसची संख्या आता दुपटीने वाढली आहे. काल जिल्ह्यात 601 एसटी कर्मचारी कर्तव्यावर हजर होते. हजर असलेल्या चालक वाहकांच्या मदतीने दिवसभरात 78 बस गाड्या धावल्या. विशेष म्हणजे जिल्ह्यातील सर्वच आगारातून काल एसटी धावली. या 78 बस गाड्यांनी दिवसभरात 317 फेऱ्या केल्या. यातून 6116 प्रवाशांनी प्रवासाचा लाभ घेतला. यापैकी अजिंठा लेणीत सर्वाधिक 2655 प्रवाशांनी प्रवास केला.
जिल्ह्यातील एसटी कर्मचारी 8 जानेवारीपासून संपावर आहेत. एसटी शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणी संदर्भात 5 जानेवारी रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे. तोपर्यंत संपावर ठाम राहण्याचा निर्धार एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.