सातारा | वन विभागाच्या हद्दीत सरत्या वर्षाअखेरीस 31 डिसेंबर रोजी पार्टी करताना आढळून आल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा सातारा वनक्षेत्रपाल डॉ. निवृत्ती चव्हाण यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. यावेळी यवतेश्वर, कास, उरमोडी धरण परिसर, ठोसेघर परिसरात गस्त घालण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पत्रकात म्हटले आहे की, सातारा तालुक्यातील काही भाग सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये मोडला जातो. त्यामध्ये वनविभागाचे क्षेत्र अधिक आहे. त्यामध्ये प्रामुख्याने यवतेश्वर महादरे गाव परिसर, कास, उरमोडी धरण परिसर, ठोसेघर, मालदेव, चाळकेवाडी या प्रसिद्ध ठिकाणांचा समावेश आहे. वर्षाअखेरीस 31 डिसेंबर रोजी या ठिकाणी तरुण मोठ्या प्रमाणावर सेलिब्रेशन करण्यासाठी येत असतात.
चुलीवर स्वयंपाक करणे, फटाक्यांची आतिषबाजी करणे, पेटत्या सिगारेटची थोटके उघड्यावर टाकणे यामुळे वनक्षेत्रात आग लागून मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे वन्य प्राण्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन ते सैरभैर होत आक्रमक होऊ शकतात. परिणामी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे या दिवशी क्षेत्रांमध्ये पाय करू नयेत अन्यथा घटनास्थळावरील साहित्य हस्तगत करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.