कराडच्या नव्या कोऱ्या एसटी स्टँडची दोन वर्षातच दुर्दशा

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड हे तालुक्याचे ठिकाण आणि या ठिकाणीच राज्य परिवहन महामंडळाचे मध्यवर्ती बसस्थानक आहे. या बसस्थानकावर विविध ठिकाणाहून बस येत जात असतात. यामुळे या बसस्थानकावर नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते. दोन वर्षांपूर्वी कराडला नवीन एसटी स्टँड बांधण्यात आले. मात्र, आज या बस स्थानकाची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे. बसस्थानकात प्रवाशांना बसण्यासाठी बसवण्यात आलेल्या बकड्यांची मोडतोड झाली असून या सठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

कोकण व घाटमाथ्याला जोडणारे व मुंबई-बेंगळुरू दरम्यानचे प्रमुख बसस्थानक म्हणून कराडची ओळख आहे. प्रमुख बाजारपेठ असल्याने व्यापारीदृष्ट्याही येथील बसस्थानकाला विशेष महत्व आहे. त्यामुळे येथे दररोज शेकडो एसटी बसच्या फेऱ्या होतात. तरीही प्रवाशांसाठी असणाऱ्या मूलभूत सुविधांही येथे मिळत नसल्याने प्रवाशांतून नाराजी व्यक्त होत आहे.

कराडचे बस स्थानक एक उत्तम बसस्थानक म्हणून गणले जात होते. मात्र, गेल्या दोन वर्षात कराडच्या या नव्या कोऱ्या बसस्थानकाची दुर्दशा झाली आहे. कराड बसस्थानकात सर्वच सुविधांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे कराड बसस्थानक प्रवाशांसाठी गैरसोयींचे आगार झाले आहे. बसस्थानकातील एकमेव पाणपोई जवळही घाणीचे साम्राज्य पसरले असल्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या दिवसांतही प्रवासी येथे पाणी पिण्यास धजावत नाहीत. याबाबत प्रवाशांनी एसटी प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही काहीच कार्यवाही होत नसल्याने प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कराडच्या बस स्थानकात अत्यंत चांगल्या दर्जाची बसवण्यात आलेली स्टीलची बाकडे तोडण्यात आली असून त्यातील काही गायबही करण्यात आली आहेत. एवढेच नाही तर हे बसस्थानक सध्या दारुड्यांचा अड्डा बनले आहे. दिसायला देखण्या असणाऱ्या या बसस्थानकावरच्या सुविधाही चांगल्या पद्धतीच्या द्याव्यात, अशी मागणी आता प्रवाशांकडून होत आहे.