हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खातेदारांकडून जमा केलेल्या पैशांवर चक्क पोस्ट मास्तरनेच डल्ला मारला असल्याची घटना मांजरखेड येथील पोष्टाच्या शाखेत घडली आहे. त्याच्याकडून दररोज खातेदारांकडून पैसे घेत त्याची खातेपुस्तकावर नोंद न करता स्वतः वापरण्यात आली आहे. या शाखेतील पोस्टमास्टरने एक-दोन नव्हे, तर तब्बल 35 लाख रुपयांचा हा घोटाळा केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मांजरखेड येथील पोष्टाच्या शाखेत जानराव किसनराव सवई या नावाचे पोस्ट मास्टर अनेक वर्षांपासून काम करत आहेत. तो पोष्टात खातेदाराकडून दररोज जमा केलेल्या रक्कमेची रीतसर पासबुक तसेच कम्पुटरमध्ये नोंद न करता परस्पर वापरत असे. हा प्रकार अनेक दिवसांपासून त्याच्याकडून केला जात होता.
ज्यावेळी खातेदारांकडून पासबुकांची मागणी केले जात असे त्यावेळी पासबुक घाल झाल्याचे त्याच्याकडून कारण सांगितले जात. अखेर हि गोष्ट चांदूर रेल्वे येथील पोस्ट ऑफिसमधील उपडाकपालांच्या कानी पडल्यानंतर त्यांनी पासबूकमध्ये नोंद असलेल्या आणि प्रत्यक्षात जमा करण्यात आलेल्या रकमेचा ताळमेळ जुळतोय का हे पाहिले.
पासबूकमध्ये नोंद असलेल्या आणि प्रत्यक्षात पोस्ट ऑफिसमधील खातेदाराच्या खात्यात जमा म्हणून नोंद असलेल्या रक्कमेत ताळमेळ नसल्याचे उपडाकपाल याच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी या प्रकरणी जानराव किसनराव सवई यांच्याकडे विचारणा केली. चौकशी अंती 16 जुलै 2021 रोजी सवई याला निलंबित केले. त्यानंतर सहायक अधीक्षक डाकघर (दक्षिण उपविभाग, अमरावती) संगीता रत्तेवार यांनी 24 डिसेंबर रोजी चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ तक्रार नोंदवत अधिक तपास केला. त्यानंतर पोस्ट मास्टर जानराव किसनराव सवई याने डी. जी. गुल्हाने, डी. एन. भाग्यवंत यांच्या मदतीने काही खातेधारकांचे पासबूक आपल्या ताब्यात घेऊन ते गहाळ केल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, आरोपी सवई याला मदत करणाऱ्या दोघांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी चांदूर रेल्वे पोलिसांत तक्रार देण्यात आली असून अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न –
खातेदारांच्या पैशांवर डल्ला मारल्यानंतर त्यांना हा प्रकार लक्षात येऊ नये यासाठी पोस्टमास्टरने अत्यंत हुशारीने खातेदारांची पासबुकच गहाळ केली. पुस्तके घाल करण्यासाठी संबंधित पोस्टमास्टरने आपल्या इतर सहकाऱ्यांचीही मदत घेतली. त्याच्या मदतीच्या साहाय्याने त्याने खातेदारांची पुस्तके गहाळ केली. त्यामुळे त्याला या प्रकारात मदत करणाऱ्या दोघा सहकाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.