परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : नारायण राणे यांच्या अटके प्रकरणात परिवहन मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांचा हात असल्याचे एका ऑडिओ क्लिपमुळे उघडकीस आले आहे. या प्रकरणी आता अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडून सुरु करण्यात आली आहे. अनिल परब यांनी अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप राणेंकडून करण्यात आलेला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि. काल एकीकडे नारायण राणे यांची अटक करण्यासाठी पोलीस अधिकारी गेले असता दुसरीकडे अनिल परब यांनी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत पोलिसांसोबत अटक करण्याबाबत बोलत असल्याचा प्रकार घडला. त्याबाबतचा एक व्हिडीओही समोर आला होता. त्या व्हिडिओत “नारायण राणे यांना ताब्यात घ्या, पोलीस फोर्स वापरा,” असे परब म्हणाले होते. या व्हिडीओवरून व अधिकाऱ्यांच्यासोबत केलेल्या संभाषणावरून भाजपने आक्रमक पावित्रा घेतला आहे.

नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार आशिष शेलार यांनीही परिवहनमंत्री अनिल परब व अधिकाऱ्यांच्यात झालेल्या चर्चेतील ऑडिओच्या प्रकरणाची व त्यातील मंत्री व आयपीएस अधिकाऱ्यांची सीबीआय चौकशी करावी,अशी मागणी केली आहे.