आजपासून कराड जनताच्या ठेवीदारांना पैसे मिळण्याची प्रक्रिया सुरुः अवसायक मनोहर माळी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

दि कराड जनता सहकारी बँक लि.कराड ही बँक दिनांक 7 डिसेंबर 2021 रोजी अवसायनात निघाली होती. डीआयसीजीसीने विहीत नमुन्यात व आवश्यक कागदपत्रांसह क्लेमफाँर्म सादर केलेल्या ठेवीदारांना त्यांच्या 5 लाख रुपये पर्यंतच्या ठेवींना विमा क्लेम रक्कम मंजूर केली आहे. पहिल्या टप्यात 39 हजार 32 ठेवीदारांना 329 कोटी 76 लाख रुपयांची रक्कम मंजूर झाली आहे. सदर रक्कम त्यांच्या अन्य बँकेतील खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया बुधवार (दि.05 मे) पासून सुरु होत असल्याची माहिती बँकेचे अवसायक तथा कराडचे उपनिबंधक (सहकारी संस्था) मनोहर माळी यांनी दिली.

कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव आणि शासनाचे निर्बंध याचा विचार करता कोणत्याही परस्थितीत ठेवीदारांनी शाखांमध्ये गर्दी करु नये. मंजूर यादीप्रमाणे ज्यांना शाखेमार्फत सूचना येईल त्यांनीच दिलेल्या वेळेत मुळ कागदपत्रांसह संबंधीत शाखेत संपर्क करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
ठेवीदारांची दीर्घकालीन प्रतिक्षा संपली असली तरी मंजूर रक्कम त्यांना त्यांच्या खात्यात जमा करणेसाठी बँकेला डीआयसीजीसीने किमान तीन महिन्यांचा कालावधी दिलेला आहे. कोविड परस्थितीमुळे हा कालावधी वाढूही शकतो. त्यामुळे ठेवीदारांनी कोणत्याही प्रकारे घाई-गडबड करण्याची गरज नाही. शाखेत बोलवणे आल्यानंतर मुळ आधारकार्ड व पॅनकार्ड सोबत घेऊन आपल्या मुळ ठेव पावत्या आणि पासबुक जमा करुन त्याची पोहोच घ्यावी.

कराड जनता बँकेत त्याची पडताळणी करुन पुढील सात दिवसात संबंधीत ठेवीदारांना त्यांनी कळविलेल्या अन्य बँकेतील खात्यात रकमा जमा देणेबाबत डीआयसीजीच्या सूचनेनुसार बँक आँफ बडौदाला यादी पाठविणेत येईल. बँक आँफ बडौदाच्या मुंबईमधील ताडदेव शाखेमार्फत कराड जनता बँकेने सादर केलेल्या यादीनुसार संबंधीत ठेवीदारांच्या खात्यावर क्लेममंजूर रकमा वर्ग होतील. त्या बँकेत कोविड परस्थितीमुळे निर्माण झालेल्या अडचणी, स्टाफची समस्या यामुळे ठेवीदाराने त्यांच्या मुळ पावत्या जमा केल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये रक्कम येण्यास साधारणपणे एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

क्लेमफाँर्म जमा केलेल्या काही ठेवीदारांचे प्रस्ताव तांत्रीक अडचणींमुळे मंजूर झालेले नाहीत, त्यांना बँकेमार्फत संपर्क करुन आवश्यक त्रुटी दूर करण्याचे कामही सुरु करण्यात आले आहे. तर ज्या ठेवीदारांनी अद्यापपर्यंत क्लेमफाँर्म जमा केलेले नाहीत त्यांनी लवकरात लवकर नजीकच्या शाखेत आवश्यक कागदपत्रांसह ते जमा करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. क्लेमफाँर्म डीआयसीजीकडे पाठवून मंजूर झाल्याशिवाय कोणालाही ठेवरक्कम मिळणार नाही, असेही मनोहर माळी यांनी आवर्जून सांगितले.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व ब्रेकिंग बातम्या मोबाईपवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा???????? http://bit.ly/3t7Alba

Leave a Comment