Wednesday, February 1, 2023

ढेबेवाडी विभागात बिबट्याच्या हल्ल्यात गाय व शेळी ठार

- Advertisement -

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील दुर्गम निवी व कसणी परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात गाय व शेळीचा मृत्यू झाला. बिबट्याच्या वाढत्या उपद्रवाने तेथील नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. सातारा व सांगली जिल्ह्याच्या सीमेवर घनदाट जंगलालगत वसलेल्या निवी-कसणी परिसरात वन्य प्राण्यांचा सतत उपद्रव जाणवत आहे. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गाय व शेळीचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच तेथे घडली.

- Advertisement -

निवीतील पारुबाई मस्कर व अन्य तीन महिला सायंकाळी पाचच्या सुमारास गावाजवळच्या म्हाळुंगीचा ओढ्याच्या परिसरातून जनावरे घेऊन घराकडे निघाल्या होत्या. त्यावेळी तेथे दबा धरून बसलेल्या बिबट्याने कळपातील शेळीवर हल्ला करत तिला फरफटत नेले.या घटनेनंतर घाबरलेल्या महिलांनी घराकडे धाव घेऊन ग्रामस्थांना माहिती दिली. दोन दिवस शोधाशोध केल्यावर जवळच्याच एका घळीत अर्धवट खाल्लेले शेळीचे अवयव आढळून आले.

कसणी येथील बुरूमवस्तीतील संजय पाटील यांच्या घराजवळ जनावरांसाठी तयार केलेल्या मांडवात घुसून बिबट्याने गाईवर हल्ला करून तिला ठार केल्याची घटना सायंकाळी सातच्या सुमारास घडली. जनावरांचा आरडाओरडा ऐकून पाटील कुटुंबीय तिकडे धावल्यावर बिबट्याने तेथून पळ काढला. वनपाल सुभाष राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक जयवंत बेंद्रे, वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मारुती पाटील, धनाजी पवार आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व ब्रेकिंग बातम्या मोबाईपवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा👉🏽 http://bit.ly/3t7Alba