Heropanti 2 – मुख्य ॲक्शन सीन्सच्या चित्रीकरणासाठी निर्मात्यांचा मोर्चा रशियाकडे

Heropanti 2
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। साजिद नाडियाडवाला यांच्या हिरोपंती २ या आगामी चित्रपटाचे मार्च महिन्यात मुंबईमध्ये एक छोटे शूटींग शेड्यूल पूर्ण करण्यात आले आहे. यानंतर आता टीमने आपली गाडी थेट रशियाकडे वळवली आहे. त्यामुळे चित्रपटाचे दुसरे शूटींग शेड्यूल आता लवकरच रशियात पार पडणार आहे. अभिनेता टायगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि नवाजुद्दीन सिद्दीकी अभिनित हिरोपंती २ ची पूर्ण टीम पुढच्या महिन्यात मॉस्कोमध्ये आणि त्यानंतर रशियातील सेंट पीटर्सबर्गमध्ये शुटींग करणार आहेत. संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “टीम मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गमध्ये चित्रपटातील मुख्य ॲक्शन सिन्ससोबत एका गाण्याचे चित्रीकरण करण्याचे योजिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तेथील स्थानिक टीमसोबत मिळून चित्रीकरणासाठी योग्य असणाऱ्या लोकेशनचा शोध घेतला जात आहे. शिवाय या चित्रपटातील अनोखे, रंजक आणि आव्हानात्मक असे ॲक्शन सीन चित्रित करण्यासाठी अनेक प्रसिद्ध स्टंट डिझायनर्ससोबत निर्मात्यांचे बोलणे सुरु आहे. या नावांमधील एक नाव सुप्रसिद्ध मार्टिन इवानो यांचे आहे. जे २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या स्कायफॉल, २००७ साली प्रदर्शित झालेल्या द बॉर्न अल्टीमेटम आणि २००४ साली प्रदर्शित झालेल्या द बॉर्न सुप्रमसी या प्रसिद्ध ॲक्शन चित्रपटांसाठी ओळखले जातात.

इतकेच नव्हे तर हिरोपंती २ शी निगडित असणाऱ्या सूत्रांनी सांगितले की, “रशियात जाण्याआधी सर्व क्रू मेंबर्स आणि कलाकारांचे लसीकरण पूर्ण करण्याकडे साजिद सर काटेकोरपणे लक्ष देत आहेत.” हिरोपंती या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच साजिद नाडियाडवालाने टायगर श्रॉफला जबरदस्त ॲक्शनसोबत रसिक प्रेक्षकांसमोर आणले होते. त्यामुळे आता हिरोपंती २ मध्ये देखील तशीच लक्षवेधक, रंजक आणि एकदम स्टायलिश ॲक्शनची मेजवानी प्रेक्षकांना पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.