सातारा । सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. संसर्ग झालेल्या अत्यावस्थ व्यक्तीला ऑक्सिजनची आवश्यकता असेल तर तो रुग्ण हा बेडपासून वंचित राहणार नाही. याची दक्षता घेण्याबरोबर ज्या रुग्णांलयांमध्ये कोरोना संसर्गावर उपचार केले जात आहेत. अशा रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडू देवू नका, अशा सूचना पालकमंत्री बाळसाहेब पाटील यांनी केल्या.
जिल्ह्यातील कोरोना संसर्गाबाबत आढावा बैठक आज सातारा येथील शासकीय विश्रामगृहात झाली. यावेळी पालकमंत्री श्री. पाटील बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा नियोजन अधिकारी बी. जे. जगदाळे आदी उपस्थित होते.
कोरोना संसर्ग रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुरेसा औषधसाठा उपलब्ध करुन ठेवा, अशा सूचना करुन पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, प्रत्येक तालुक्यातील रुग्णवाहिकेची मागणी आल्यास तात्काळ उपलब्ध करुन द्या. कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे यासाठी आवाहन करावे. कोरोना संसर्ग रोखणे हे शासनाची, प्रशासनाची जबाबदारी आहे तशीच नागरिकांची मोठी जबाबदारी आहे. यासाठी प्रत्येक नागरिकाने मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व वेळोवेळी हाताची स्वच्छता केली पाहिजे, असे आवाहनही पालकमंत्री श्री. पाटील यांनी बैठकीत केले.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group