हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| दिल्ली विधानसभा निवडणुकीत (Delhi Assembly Election) भाजपाने ऐतिहासिक विजय मिळवत आपचा दारुण पराभव केला आहे. त्यामुळे मागील दहा वर्षांपासून दिल्लीवर राज्य करणाऱ्या आम आदमी पक्षाला (आप) या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. महत्वाचे म्हणजे, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचा नवी दिल्ली मतदारसंघातून पराभव झाला आहे.
खरे तर दिल्लीची सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने सर्वात जास्त प्रयत्न केले होते. याचाच परिणाम आजच्या निकालातून दिसून आला आहे. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच भाजपाने आघाडी घेतली होती आणि ती कायम ठेवत भाजपने 47 जागांवर विजय मिळवला. दुसरीकडे आप पक्ष केवळ 27 जागांवर आघाडी राखू शकला. तर या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे दिल्लीतील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलले आहे.
दरम्यान, दिल्लीमध्ये सत्ता राखून धरणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना यंदा निवडणुकीत मोठा पराभव सहन करावा लागला आहे. इतकेच नव्हे तर, नवी दिल्लीमध्ये देखील अरविंद केजरीवाल निवडून येऊ शकलेले नाहीत. दिल्ली मतदारसंघात भाजपाचे उमेदवार परवेश सिंह यांनी त्यांचा 3865 मतांनी पराभव केला आहे. याच मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे उमेदवार संदीप दीक्षित यांना 4254 मते मिळाली. परंतु, जर काँग्रेसने या मतदारसंघात आपला उमेदवार उभा केला नसता तर ही मते आपच्या वाटेला आली असती.
महत्वाचे म्हणजे, दिल्लीच्या या निकालाने स्पष्ट झाले की भाजपाने प्रभावी प्रचार आणि रणनीतीद्वारे आपच्या दहा वर्षांच्या सत्तेला संपवले आहे. काँग्रेस-आप यांच्यातील समन्वयाचा अभाव तसेच काही निर्णयांविषयी वाढलेला जनतेचा रोष यामुळे आप सत्तेत येऊ शकलेली नाही. त्यामुळे आता दिल्लीत पुन्हा उभे राहण्यासाठी आपला मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत.